दत्तगुरु परात्पर गुरु डॉक्टरांची महती सांगती।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘२९.१२.२०२० या दिवशी दत्तजयंती होती. त्या दिवशी आमचा व्यष्टी साधनेचा आढावा होता. मी सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या आढाव्यात होतो. सद्गुरु दादा आढाव्याच्या आरंभी आमच्यापैकी कुणालाही भावप्रयोग घ्यायला सांगतात. मी ‘कोणता भावप्रयोग घ्यायचा ?’, असा विचार करत प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसलो होतो. तेव्हा ‘आज दत्तजयंती आहे. दत्तगुरूंची मानसपूजा घेऊ शकतो’, असे एका साधिकेने मला सुचवले. त्याप्रमाणे मी त्या भावप्रयोगाची सिद्धता केली.

भावप्रयोगात दत्तगुरूंचे पूजन आणि आरती झाल्यावर दत्तगुरूंनी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे माहात्म्य सांगितले अन् काही क्षणांत त्यांनी मला तेच माहात्म्य श्लोकाच्या रूपात सुचवले.

श्री. शशांक जोशी

साधक दत्तगुरूंसी प्रार्थना करिती ।
ते त्वरितची दर्शन देती ।
दत्तगुरु म्हणती साधक जना ।। १ ।।

तुम्ही मला प्रार्थना करिता ।
त्याची नसे आवश्यकता ।
परात्पर गुरु डॉक्टर असता भूवरी ।। २ ।।

दत्तगुरु परात्पर गुरु डॉक्टरांची महती सांगती ।
ऐका होऊन एकाग्र चित्ती ।
श्रवणमात्रे भावजागृती तुम्ही खचीत अनुभवाल ।। ३ ।।

दत्तगुरु परात्पर गुरु डॉक्टरांविषयी सांगतात ।
‘तेची ब्रह्मा, तेची श्रीविष्णूचे रूप, तेची महेश असती ।
तेची अखिल ब्रह्मांडनायक,
सर्व देवीदेवता त्यांच्यातची वसती ।। ४ ।।

त्यांच्या मानवी देहास पाहून ।
भुलू नकोस मानव म्हणोनी ।
अखिल ब्रह्मांडाचा कारभार तेची हाकिती ।। ५ ।।

त्यांच्यासी अशक्यप्राय ।
असे काहीच नसे त्रिभुवनात ।
ऐसे जाणूनी खचीत, दृढ श्रद्धा ठेवी मग ।। ६ ।।

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सुचलेली ही शब्दसुमने त्यांच्या कोमल चरणी अर्पण करतो. श्री दत्तगुरूंनी सांगितल्याप्रमाणे ‘परात्पर गुरु डॉक्टरांविषयी दृढ श्रद्धा आम्हा सर्व साधकांमध्ये निर्माण होऊन आम्हाला त्यांच्या चरणांशी एकरूप होता येऊ दे’, अशी प्रार्थना करतो.’

– श्री. शशांक जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक