लुधियाना बाँबस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला अटक

खलिस्तानी आतंकवादी हरप्रीत सिंह उपाख्य हॅप्पी (डावीकडे)

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) वर्ष २०२१ मध्ये पंजाबच्या लुधियाना येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी पसार असणार्‍या हरप्रीत सिंह उपाख्य हॅप्पी या खलिस्तानी आतंकवाद्याला देहली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात अटक केली. या स्फोटात एक जण ठार, तर ६ जण घायाळ झाले होते. यापूर्वी एन्.आय.ए.ने हरप्रीत सिंह याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. या प्रकरणात यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली आहे.

एन्.आय.ए.ने सांगितले की, पाकिस्तानस्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा प्रमुख हरप्रीत हा लखबीर सिंह रोडे याचा सहकारी आहे. लुधियाना न्यायालयातील बाँबस्फोटाचा तो मुख्य सूत्रधार आहे. रोडे याच्या सूचनेनुसार हरप्रीत याने बाँबच्या वितरणासाठी साहाय्य केले होते. हा बाँब पाकिस्तानमधून भारतात रोडे याच्या साथीदारांना पाठवण्यात आला होता.