इस्रायली साम्यवादी !

गोव्यात झालेल्या ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षकांपैकी एक असलेल्या साम्यवादी वृत्तीच्या इस्रायली नदव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ या भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या, सर्वप्रथम काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणार्‍या आणि प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या हिंदी चित्रपटाला ‘प्रचारकी’ म्हणून हिणवून त्याचा अत्यंत हीनतेने उल्लेख केला. त्यामुळे भारतातील हिंदुद्वेषी साम्यवाद्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एक अतिशय चांगली आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारताचे इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी तात्काळ याचा निषेध करून या वक्तव्याविषयी क्षमा मागितली आहे. त्यामुळे ‘इस्रायलचे अधिकृत मत काय आहे ?’, ते समोर आले आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी विस्तृतपणे त्यांची भारताविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे आणि ‘इस्रायलही आतंकवाद्यांशी झुंझत असल्याने दोघांचा शत्रू एकच आहे’, हे स्पष्ट केले आहे. ही गोष्ट भारतालाही आवर्जून शिकण्यासारखी आहे.

जेव्हा विदेशातील साम्यवादी भारतातील साम्यवाद्यांना हाताशी धरून भारत आणि हिंदु विरोधी संमेलने, परिषदा, शिबिरे, ट्विटर ट्रेंड आदी उपक्रम चालवतात, तेव्हा भारत सरकारच्या वतीने त्या संपूर्ण देशाला कळेल, एवढ्या स्पष्टपणे तात्काळ योग्य उत्तर पुढे मांडले गेले पाहिजे. पुढील वेळी ‘अशा भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी व्यक्तींना परीक्षक म्हणून बोलवायचे का ?’, याचाही संबंधितांनी विचार केला पाहिजे. अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्‍या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !

काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद नाकारणे; म्हणजे सत्य इतिहास डावलण्यासारखे आहे, हे लक्षात घ्या !