यापुढे पोलीस निरीक्षकांनाच वाहतूक नियमभंगासाठी दंडात्मक कारवाईचा अधिकार ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री, गोवा

रात्रीच्या वेळी पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक हेच ठोठावू शकतात दंड

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – वाहतुकीचा नियमभंग झाल्यास यापुढे वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार अंगावर ‘कॅमेरा’ (बॉडीकॅम) लावलेल्या पोलीस निरीक्षकांनाच असणार आहे आणि अन्य कुणालाही असणार नाही. रात्रीच्या वेळी पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक, हेच अशी कारवाई करू शकणार आहेत. ही व्यवस्था आजपासून लागू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत राज्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, पोलीस महासंचालक आलोक कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची ४ एप्रिल या दिवशी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. पत्रकार परिषदेला समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचीही उपस्थिती होती. बैठकीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारतीय न्याय संहितेखाली ३ फौजदारी कायद्यांच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

ते पुढे म्हणाले, ‘‘याखेरीज ‘डॅश कॅमेरे’, ‘सिग्नल कॅमेरे’ आणि इतर कृत्रिम बुद्धीमत्तेवर (‘ए.आय.’वर – ‘आर्टीफिशियल इंटेलिजन्स’वर) आधारित प्रणालींद्वारे थेट नियमभंग करणार्‍यांच्या घरी चलन पाठवले जाणार आहे. जर कोणताही पोलीस कुणालाही चलन देण्यासाठी अडवत असेल, तर संबंधित व्यक्तीने त्या पोलिसाचे छायाचित्र काढून पोलीस विभागाकडे पाठवल्यास संबंधित पोलिसावर त्वरित निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

संघटित गुन्हेगारीची ८ प्रकरणे नोंद

गोव्यात वर्ष २०२३ च्या भारतीय न्याय संहितेचे कलम १११ आणि १०२ अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे ८ गुन्हे नोंद झाले आहेत. सर्व पोलीस ठाण्यांसाठी नवीन कायद्याच्या अंतर्गत संघटित गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कारागृह आणि पोलीस ठाणे येथे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची सोय उपलब्ध केली जाणार आहे. राज्याचे गुन्हे उकल प्रमाण (गुन्ह्यांचा शोध लागणे) ९० टक्के आहे आणि हे आणखी वाढणार आहे.’’

रस्त्याच्या कडेला स्वयंपाक केल्यास उपकरणे कह्यात घेणार

गोव्यात प्रवेश करतांना गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह आणणार्‍या पर्यटकांना सीमेवर अडवले जाणार आहे आणि त्यांचे ते साहित्य कह्यात घेतले जाणार आहे. समुद्रकिनारे किंवा रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करून घाण करणार्‍यांची उपकरणे कायमस्वरूपी कह्यात घेतली जाणार आहेत.

भिकारी आणि दलाल यांच्यावर कारवाई करणार

राज्य स्वच्छ आणि हरित ठेवायचे असल्यास नियम कठोरपणे पाळावे लागतील. आजपासून समुद्रकिनार्‍यावर मसाजच्या नावाखाली फिरणारे लोक, भिकारी, दलाल आदी सर्व व्यक्तींना पोलीस केवळ दंड घेऊन सोडणार नाहीत, तर त्यांना कारागृहात पाठवणार आहे. त्यांना कायम कारागृहात रहावे लागणार आहे.