भाविकांच्या सुविधेसाठी १ सहस्र २०० कर्मचारी आणि स्वयंसेवक यांची नियुक्ती

पंढरपूर – चैत्री यात्रेसाठी भाविक आणि वारकरी यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, तसेच जलद दर्शन व्हावे यांसाठी मंदिर समितीने जय्यत सिद्धता केली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी १ सहस्र २०० कर्मचारी आणि स्वयंसेवक यांची नियुक्ती केली असून ४ अतिरिक्त पत्राशेड उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील ‘रेस्क्यू व्हॅन’ प्रशिक्षित कर्मचार्यांसह, अग्नीशमन यंत्रणा, धातू शोधणारे यंत्र, भ्रमणभाष लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, अपघात विमा यांसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य व्यवस्थेसाठी पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दर्शनमंडप येथे अतीदक्षता विभाग, तसेच ‘वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ यांच्याकडून विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह २ अद्ययावत रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येत आहेत.
अन्नछत्रामध्ये दुपारी १२ ते २, सायं. ७ ते रात्री ९ या वेळेत अन्नदान चालू रहाणार आहे. दर्शनरांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत, मठ्ठा आणि तांदळाची अथवा साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येणार आहे. भाविकांच्या हस्ते होणार्या पूजेची संख्या अल्प करून, अतीमहनीय व्यक्तींच्या दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. श्री विठ्ठल दर्शनाची वेळ वाढवून सकाळी ६ ते रात्री १२ अशी करण्यात आली आहे, असे मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.