श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील पूजा, मंत्रोच्चार यांचे थेट प्रक्षेपण आणि ध्वनीप्रसारण भाविकांसाठी नियमित चालू ठेवा !

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली (डावीकडे) यांना निवेदन देतांना मंदिर महासंघाचे पदाधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ४ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई-श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात प्रतिदिन गाभार्‍यात मंत्रोच्चार, विधीवत् पूजा आणि आरत्या होतात. तरी श्री अंबाबाई-श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील परिसरात आधीपासून अस्तित्वात असलेल्या ध्वनीप्रसारण (स्पीकर) प्रणालीद्वारे प्रतिदिन गाभार्‍यात होणारे मंत्रोच्चार, पूजाअर्चा आणि आरत्या सर्व भाविकांसाठी स्पष्ट ऐकवण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले.

या प्रसंगी मंदिर महासंघाचे संयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, श्री. प्रशांत पाटील, अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. विकास जाधव, एकवीरादेवी मंदिराचे पुजारी श्री. अनिकेत गुरव उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री अंबाबाई-श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या वतीने कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘एल्.ई.डी. स्क्रीन’वर मंदिरातील थेट प्रक्षेपण दाखवले जाते. या ठिकाणीही योग्य ध्वनीयंत्रणेच्या माध्यमातून त्याच वेळी पूजाअर्चा, मंत्रोच्चार आणि आरत्या ऐकवण्यात याव्यात. जेणेकरून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांनाही याचा लाभ घेता येईल.