उडुपी (कर्नाटक) येथे मुसलमान विद्यार्थ्याला ‘आतंकवादी’ संबोधणारा शिक्षक निलंबित !

उडुपी (कर्नाटक) – येथे मुसलमान विद्यार्थ्याची तुलना जिहादी आतंकवादी कसाबशी केल्याच्या प्रकरणी ‘मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले. विद्यार्थ्याने नाव सांगितल्यावर शिक्षक म्हणाले की, ‘अरे !. तू कसाबसारखा आहेस.’ यावर विद्यार्थ्याला पुष्कळ राग आला.

शिक्षक आणि मुसलमान विद्यार्थी यांच्यातील संभाषण !

१. शिक्षकाच्या ‘कसाब’च्या प्रतिक्रियेवर विद्यार्थी म्हणाला, ‘‘२६/११ ही विनोद करण्यासारखी गोष्ट नाही. या देशात मुसलमान असणे आणि अशा गोष्टी प्रतिदिन ऐकणे, हा काही विनोद नाही. तुम्ही माझ्या धर्माची चेष्टा करू शकत नाही आणि तीही अशा निंदनीय पद्धतीने ! हा विनोद नाही !’ (किती हिंदु विद्यार्थ्यांमध्ये या मुसलमान विद्यार्थ्यासारखा धर्माभिमान आहे ? हिंदूंमधील धर्माभिमानशून्यतेमुळेच आज भारतातच काय, तर जगभरात कुठेही हिंदूंना कोणतेच मूल्य नाही, हे जाणा ! – संपादक) (२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या आतंकवादी आक्रमणांत १६६ लोक मारले गेले होते. त्या वेळी सुरक्षा यंत्रणांनी ‘कसाब’ या पाकमधील आतंकवाद्याला पकडले होते.)

२. यावर शिक्षक त्या मुसलमान विद्यार्थ्याला म्हणाले, ‘तू माझ्या मुलासारखा आहेस !’

३. यावर विद्यार्थ्याने विचारले, ‘मी जर तुमच्या मुलासारखा आहे असे वाटते, तर मग तुम्ही तुमच्या मुलाला आतंकवाद्याच्या नावाने हाक माराल का ? तेही इतक्या लोकांसमोर ? तुम्ही व्यवसायाने शिक्षक आहात.’ त्यानंतर शिक्षकाने त्याची क्षमा मागितली.

४. तेव्हा तो विद्यार्थी म्हणाला की, क्षमा मागितल्याने ना तुमची विचारसरणी पालटणार आहे, ना तुमच्या वागण्यात पालट होणार आहे ! (हिंदु विद्यार्थ्यांनो, असा धर्माभिमान तुमच्यात आहे का ?, याचा अंतर्मुख होऊन विचार करा ! – संपादक)

या संभाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर संस्थेने शिक्षकाला निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी चालू आहे. संस्थेने म्हटले आहे की, आम्ही असे वर्तन करणार्‍यांना क्षमा करत नाही.

संपादकीय भूमिका

कोणत्याही भारतीय नागरिकावर त्याच्या धार्मिक ओळखीवरून चिखलफेक करणे सर्वथा अनुचित आहे. असे असले, तरी या देशातील बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना प्रतिदिन तुडवल्या जात असतांना, तसेच त्यांच्या विरोधात जीवघेणे फतवे काढले जात असतांना कोणतीच ठोस कारवाई होतांना दिसत नाही, हेही तितकेच सत्य आहे !