१. दुचाकी गाडीने रामनाथी आश्रमात गेल्यावर आभाळ भरून आल्याने पाऊस पडण्याची शक्यता वाटणे आणि पू. वामन यांनी आकाशाकडे बघून पावसाला ‘मित्रा, आता तू येऊ नकोस’, असे म्हणून प्रार्थना करणे
‘१७.९.२०२२ या दिवशी संध्याकाळी आम्ही दुचाकी गाडीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा चांगले ऊन पडले होते. आश्रमातून घरी परत येतांना अकस्मात् थोडा पाऊस पडायला लागला; म्हणून मी आणि पू. वामन थोडा वेळ आश्रमातच थांबलो. काही वेळाने पाऊस थांबला आणि आम्ही घरी यायला निघालो. तेव्हा आभाळ भरून आले होते आणि ‘कधीही पाऊस पडेल’, असे वाटत होते. आम्ही प्रार्थना करून आश्रमातून बाहेर निघालो. तेव्हा पू. वामन दुचाकी गाडीसमोर उभे होते आणि सारखे वर आकाशाकडे बघून म्हणत होते, ‘मित्रा, आता तू येऊ नकोस. मित्रा ऐकतोस ना, आता तू पडू नको हा.’
२. घराजवळ पोचल्यावर पू. वामन यांनी आईला त्वरित ‘घरी जाऊया’, असे सांगणे, घरी पोचल्यावर लगेच पाऊस चालू होणे आणि पू. वामन यांनी ‘पाऊस’ या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
नंतर आम्ही फोंड्यातील आमच्या घराजवळ पोचलो. तेव्हा मी पू. वामन यांना म्हटले, ‘‘आपण थोडे साहित्य घेऊया का दुकानातून ?’’ ते म्हणाले, ‘‘नको आई, माझ्या मित्राला थांबून रहावे लागेल. तू उद्या तुला काय पाहिजे ते आण !’’ मी त्यांना ‘हो’ म्हटले आणि आम्ही थेट घरीच आलो. घरी आल्यावर काही क्षणांतच पाऊस चालू झाला. तेव्हा पू. वामन म्हणाले, ‘आला माझा मित्र. आता तू पाहिजे तेवढा वेळ ये हं मित्रा !’ त्यांनी हात जोडून नमस्कार करत त्यांच्या मित्राला, म्हणजे वरुणदेवाला (पावसाला) कृतज्ञता व्यक्त केली.
३. पावसाने पू. वामन आणि साधिका या दोघांची प्रार्थना ऐकल्याने कृतज्ञता व्यक्त होणे
दुचाकी गाडीवरून येतांना माझ्या मनात केवळ एकच विचार होता, ‘पू. वामन पावसात भिजायला नकोत आणि त्यांना त्रास व्हायला नको.’ पू. वामन यांचा विचार होता, ‘आई भिजायला नको. पाऊस आला, तर आई गाडी कशी चालवणार.’ पू. वामन यांची आणि माझीही प्रार्थना पावसाने ऐकली. त्या वेळी आणि घरी आल्यावरही माझी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.
परम पूज्य गुरुदेव, तुमच्या या बाल रूपाची अजून एक दैवी लीला मला अनुभवायला मिळाली. हे भाग्य केवळ आणि केवळ आपल्याच कृपेने अनुभवता येत आहे. याबद्दल आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’
कृतज्ञता,
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई, वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (१७.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |