युक्रेनमध्ये झेलेंस्की यांच्या विरोधात प्रथमच बंड !

  • ‘मार्शल लॉ’ लागू करत विरोधकांना टाकले कारागृहात !

  • राजकीय पक्षांची मान्यता रहित !

  • श्रीमंत विरोधकांची संपत्ती जप्त !

युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेंस्की

क्रोप्यव्हत्स्की  (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता ९ मास उलटले आहेत. यामुळे तेथील स्थिती अत्यंत भयावह झाली आहे. आता युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेंस्की यांच्या विरोधात प्रथमच जनतेमध्ये बंडाचे सूर उमटत आहेत. किव्हसह व्हिनितसिया, मायकोलोव्ह आणि ओडेसा या शहरांत लोकांनी झेलेंस्की यांच्या विरोधात आंदोलने केली आहेत. ‘मार्शल लॉ’ लागू होण्याचा राजकीय लाभ झेलेंस्की घेत आहेत, असा लोकांचा आरोप आहे. प्रमुख विरोधी नेते व्हिक्तोर मेदवेचुक यांच्यासह जवळपास सर्वच विरोधी पक्षनेत्यांना झेलेंस्की यांनी कारागृहात टाकले आहे. नंतर मेदवेचुक कारागृहातून पळाले. झेलेंस्की यांनी देशातील ११ प्रमुख विरोधी पक्ष रशियाचे समर्थक असल्याचा आरोप करत त्यांची मान्यताही रहित केली आहे.

१. झेलेंस्की यांनी युक्रेनमधील सर्व खासगी दूरचित्रवाहिन्यांचे राष्ट्रीयीकरण केले असून त्याला ‘एकात्मिक माहिती धोरण’ असे नाव दिले आहे. या वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या कार्यक्रमांचा लिखाण, प्रकार, आशय आधी ‘सेक्युरिटी सर्व्हिस ऑफ युक्रेन’कडून संमत करून घ्यावा लागतो. झेलेंस्की किंवा सरकारविरोधात सामाजिक माध्यांवर युद्धाचे व्हिडिओ टाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकीची गुप्तहेर संस्था ‘सीआयए’चे हेरदेखील प्रसारणावर लक्ष ठेवतात.

२. झेलेंस्की यांनी त्यांच्या विरोधक असणार्‍या श्रीमंतांची ६९ टक्के संपत्ती जप्त केली आहे. रिनत अखमेतोव्ह यांची मालमत्ता युद्धानंतर १ लाख १२ सहस्र कोटी रुपयांवरून  घटून ३५ सहस्र कोटी इतकी राहिली आहे. वादयान नोव्हिन्स्की यांची संपत्ती २८ सहस्र  कोटी रुपयांवरून १० सहस्र कोटी रुपये झाली आहे. झेलेंस्की यांनी ४ इतर विरोधी श्रीमंतांची मालमत्ता ‘अँट ओलीगार्क’ कायद्यान्वये जप्त करत सरकारी तिजोरीत जमा केली आहे.