मुंबई – ‘एखादी चांगली गोष्ट घडवायची असेल, तर खुशाल खोटे बोला’, अशी आमची कृष्णनीती सांगते. छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग यांना तहामध्ये दिलेले गड-दुर्ग देण्यामागे कृष्णनीतीच होती. ज्याला हे कळत नाही, त्याला ‘गुळगुळीत मेंदूचा’ म्हणावे लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ? त्यांनी किती हालअपेष्टा सहन केल्या ? याची माहिती राहुल गांधी यांना आहे का ? म्हणे सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली. सावरकर यांच्यावर बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे का ? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. २७ नोव्हेंबर या दिवशी गोरेगाव येथे गटनेत्यांच्या सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.
मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.#rahulgandhi #MNS #rajthckeray https://t.co/EYc8As7uWq
— Lokmat (@lokmat) November 27, 2022
राज ठाकरे म्हणाले, ‘‘धोरण म्हणून काही गोष्ट असते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’. ५० वर्षे कारागृहात सडत रहाण्यापेक्षा कृष्णनीतीने कारागृहाच्या बाहेर पडणे हे कधीही चांगले. महापुरुषांवर अशी टीका करणे आता बंद करा. महापुरुषांची अपकीर्ती करून हाती काहीही लागणार नाही. या देशापुढे नोकर्या, आरोग्य, उद्योगधंदे, सुरक्षितता यांचे प्रश्न उभे आहेत. मोहल्ल्यांमध्ये काय उभे रहात आहे ? याचा सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करायला हवा. भोग्यांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. राजकारणाचा दर्जा किती खालावला आहे ! वृत्तवाहिनीवर राजकीय पक्षाचे नेते जी भाषा बोलतात ?, असा महाराष्ट्र मी कधीही पाहिलेला नाही. मंत्री वृत्तवाहिनीवर महिलांना शिव्या देतो. इतके खाली जायचे नसेल, तर अशा राजकारण्यांची नावे घेणे बंद करा. यासाठीच महाराष्ट्रातील साधू-संतांनी या भूमीवर संस्कार केले का ? असा महाराष्ट्र आपण उघड्या डोळ्यांनी पहायचा का ? येथील कलुषित वातावरणामुळे युवक-युवती भारत सोडून परदेशात जात आहेत, याचा विचार करा.’’