देहलीच्या जामा मशिदीमध्ये एकट्या मुलीला येण्यास बंदीचा आदेश विरोधानंतर इमाम बुखारी यांनी घेतला मागे

नवी देहली – येथील ऐतिहासिक जामा मशिदीमध्ये आता एकट्या तरुणीने किंवा अनेक तरुणींना पुरुषाविना जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याविषयी मशिदीच्या प्रवेशद्वारावर सूचना लिहिण्यात आली आहे. बंदीवरून मशिदीच्या प्रशासनावर टीका होऊ लागली. देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी मशीद प्रशासनाला याविषयी नोटीस बजावली, तसेच विश्‍व हिंदु परिषदेनेही याचा विरोध केला. त्यानंतर देहलीचे उपराज्यपाल व्हि.के. सक्सेना यांनी मशिदीचे इमाम बुखारी यांनी आदेश मागे घेण्याची विनंती केल्यावर तो मागे घेण्यात आला आहे.

१. मशिदीचे प्रवक्ते सबीउल्लाह यांनी सांगितले की, मशिदीचे स्थान प्रार्थनेसाठी आहे; मात्र येथे फिरण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, नृत्य करण्यासाठी, छायाचित्रे काढण्यासाठी तरुणी येत असतात. कोणत्याही धार्मिक स्थळी अशा प्रकारचे कृत्य होऊ नये, मग ती मशीद, मंदिर अथवा गुरुद्वारे असेल. त्याचे पावित्र्य, मर्यादा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे महिला त्यांच्या कुटुंबासमवेत येऊ शकतात. पुरुषांसमवेत येऊ शकतात, त्यांच्यावर कोणतीही बंदी नाही.

२. विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, भारताचे सीरिया बनवण्याची मानसिकता असणारे कट्टरतावादी मुसलमान इराणमधील घटनांपासून धडा घेत नाहीत. त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, हा भारत आहे.

संपादकीय भूमिका

  • एखाद्या मंदिरामध्ये अशा प्रकारची बंदी घालण्यात आली असती, तर देशातील एकजात पुरो(अधो)गाम्यांनी एव्हाना देश डोक्यावर घेत आकांडतांडव केला असता; मात्र आता सारे काही शांत आहे !
  • शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर प्रवेशासाठी आंदोलन करणार्‍या तृप्ती देसाई, पू. भिडेगुरुजी यांच्या टिकलीच्या विधानावरून त्यांना जाब विचारणार्‍या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आता कुठे आहेत ?