जामनेर, एरंडोल (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा !

लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करण्याची मागणी

मोर्च्यात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

जळगाव, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मोर्चा काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले. जामनेर येथे धारिवाल महाविद्यालय ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढून शेवटी तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. एरंडोल येथेही निवासी नायब तहसीलदार यांना मोर्च्यानंतर निवेदन देण्यात आले.

श्रद्धाच्या मारेकर्‍याला जलदगती न्यायालयात उपस्थित करून तात्काळ शिक्षा देण्यात यावी, तसेच लव्ह जिहाद आणि आंतरधर्मीय विवाहांवर बंदी घालण्यात यावी, या मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

जामनेर येथे नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, नगरसेविका, नगरसेवक, अधिवक्ता तसेच सर्वश्री एम्.एस्. पंडित, कर्ण बारी, नीलेश माळी, प्रमोद सोनवणे, अजय सपकाळ, कैलास पालवे, विजय शिरसाठ, जितेंद्र नेमाडे, गोपाल बुळे, चेतन नेमाडे, गणेश चौधरी यांसह शेकडो धर्मबंधू, भगिनी, महाविद्यालयीन युवती उपस्थित होत्या. एरंडोल येथे बजरंग दल संयोजक श्री. भरत महाजन, विश्व हिंदु परिषदेचे श्री. भूषण चौधरी यांसह असंख्य कार्यकर्ते आणि महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.