खरेतर ब्रह्मदेव हे आदिपुरुष आहेत. प्रभु श्रीराम श्रीविष्णूचे सातवे अवतार आहेत. त्यांना आदिपुरुष संबोधून नवीन पिढीला आधीच्या ६ अवतारांचा विसर पडेल, असे हे हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत. स्व. रामानंद सागर यांनी बनवलेली ‘रामायण’ ही मालिका कोरोना महामारीच्या काळात सर्व प्रकारचे उच्चांक मोडून आबालवृद्धांनी पाहिली. यातून हे स्पष्ट होते की, आजही श्रीराम, हनुमान या देवतांना त्यांच्या मूळ रूपातच पाहणे सर्वजण पसंत करतात. त्या रूपाला पाहून भाव जागृत होतो. आजही कित्येक गावात रामचरित मानसचे नित्य पठण केले जाते. रामायणातील संस्कृती आणि धर्मशास्त्र यांचे आचरण केले जाते. त्यामुळे चित्रपटात कोणताही तर्क नको, तर शास्त्रानुसार योग्य तेच दाखवावे.