दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश !

शेतकर्‍यांची आर्थिक लूट न्यून होणार !

सातारा, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – दूध संकलन केंद्रातील सध्याचे इलेक्ट्रॉनिक काटे हे १०० ग्रॅमची अचूकता दर्शवतात. यामुळे दुधाच्या मापनामध्ये दोष निर्माण होऊन शेतकर्‍यांची आर्थिक हानी होते. यावर उपाय म्हणून दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश वैधमापन शास्त्र विभागाने नुकतेच दिले. १ जानेवारी २०२३ पासून यावर प्रत्यक्ष कार्यवाहीला प्रारंभ होणार आहे.

दूध संकलन केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांच्या माध्यमातून होणारी शेतकर्‍यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी वैधमापन विभागाकडे अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारी सोडवण्यासाठी विविध दुग्धसंकलन केंद्रावर सध्याच्या मापनविषयक कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शासनाकडून २ समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. या अभ्यास समितीने अभ्यास करून दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याच्या सूचना वैधमापन शास्त्र विभागाकडे केल्या. या सूचनांचा विचार करून वैधमापन शास्त्र विभागाने हा निर्णय घेतला. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे वैधमापन शास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.