रेठरे आणि शेरे या गावांना पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची ग्रामस्थांची मागणी !

कराड, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – तालुक्यातील रेठरे बुद्रुक आणि शेरे या गावांना पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे नागरिकांची अनेक प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. सध्या अर्धवेळ नेमणुकीवर असलेले अधिकारी त्यांच्या वेळेनुसार कामकाज पहात असल्याने अनेक कामे प्रलंबित रहात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या गावांना पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक) रेठरे बुद्रुक आणि शेरे ही गावे लोकसंख्येने मोठी असून गावांना ६ मासांपासून पूर्णवेळ ग्रामसेवक नाही. त्यामुळे आहे त्या अधिकार्‍यांना गावांचा पदभार सांभाळावा लागत आहे.