पुणे येथील नवले पुलावरील अपघातात टँकरचे ब्रेक निकामी झाले नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे स्पष्टीकरण

वाहनचालकावर गुन्हा नोंद

नवले पुल अपघात

पुणे – येथील पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज-आंबेगावजवळील नवले पुलावर २० नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजता मुंबईच्या दिशेने जात असलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला होता. हा टँकर सातार्‍याहून मुंबईच्या दिशेने येत होता. या अपघातात टँकरने २० हून अधिक गाड्यांना उडवले, अनुमाने ४८ गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात जवळपास ४० गाड्यांची हानी झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेकजण घायाळ झाले आहेत. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीनंतर नवी माहिती समोर आली. चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केले आणि गाडी ‘न्यूट्रल’मध्ये टाकून तो गाडी चालवत होता; पण वेग प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटून वेळेत ब्रेक दाबता न आल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. मणिराम यादव असे चालकाचे नाव असून तो मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

या अपघाताची नोंद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, ते तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या अपघातात घायाळ झालेल्या प्रवाशांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमनदलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी आल्या होत्या. गेल्या अनेक मासांपासून या ठिकाणी अपघातांची मालिका चालू आहे. यावर ठोस कारवाई करण्यात प्रशासन कुचकामी ठरत असून अजून किती अपघातात लोकांना जीव गमवावे लागतील आणि किती जणांना जायबंदी व्हावे लागेल, असे प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अपघाताचे चलचित्र, छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले असून त्यातून अपघाताची तीव्रता समजते.