गोवा येथील श्री. दीपक छत्रे यांना देवपूजा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. देवपूजेनंतर प.पू. डॉ. आठवले यांच्या चरणी ‘हे श्रीमन्नारायणा, माझ्या जीवनात तुला अपेक्षित असेच सर्व घडू दे’, अशी प्रार्थना होणे आणि या प्रार्थनेमुळे देवपूजेतून मिळणारा आनंद उत्तरोत्तर वृद्धींगत होऊन मनातील चिंता न्यून होणे

मी नेहमी घरात देवपूजा झाल्यानंतर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। ’ हा श्लोक म्हणतो. त्यानंतर माझ्याकडून प.पू. गुरुदेवांना पुढील प्रार्थना होते, ‘गुरुदेव, माझ्या जीवनातील सर्व संकटांचे समूळ उच्चाटन होऊ दे. माझ्या सर्व पापांचे क्षालन होऊ दे. देवतांची कृपादृष्टी माझ्यावर अखंड राहू दे आणि माझ्याकडून सातत्याने आपल्याला अपेक्षित अशी साधना होऊ दे.’ डिसेंबर २०२१ मध्ये एके दिवशी माझ्याकडून ही नेहमीची प्रार्थना न होता आपोआप ‘हे श्रीमन्नारायणा, माझ्या जीवनात तुला अपेक्षित असेच सर्व घडू दे’, अशी प्रार्थना झाली. त्या वेळी ‘माझ्याकडून अचानक अशी प्रार्थना कशी झाली ?’, ते मला कळले नाही. तेव्हा ‘माझ्या मनातील हा भावनिक विचार असेल’, असे समजून मी पुन्हा माझी नेहमीची प्रार्थना केली. देवपूजा झाल्यानंतर माझ्याकडून ३ – ४ वेळा पुन्हा तशीच (पालटलेली) प्रार्थना झाली. तेव्हापासून मी ‘हे श्रीमन्नारायणा, माझ्या जीवनात तुला अपेक्षित असेच सर्व काही घडू दे’, हीच प्रार्थना नियमितपणे करू लागलो. या प्रार्थनेमुळे मला देवपूजेतून मिळणारा आनंद उत्तरोत्तर वृद्धींगत झाला, तसेच ‘मला व्यावहारिक जीवनात वाटणार्‍या आव्हानांची भीती आणि काळजी उदा. मुलांच्या भवितव्याची काळजी, ऐहिक गोष्टींविषयी वाटणारी चिंता न्यून झाली’, असे मला जाणवले.

श्री. दीपक छत्रे

२. देवघरातील प.पू. डॉ. आठवले यांच्या छायाचित्राभोवती तेजस्वी प्रकाश दिसून तो हळूहळू सर्वत्र पसरत असल्याचे दिसणे आणि त्या प्रकाशाने संपूर्ण ब्रह्मांड व्यापले असल्याचे जाणवणे

१९.२.२०२२ या दिवशी मी देवपूजेनंतर नेहमीप्रमाणे गुरुवंदनेचा श्लोक म्हणून प.पू. डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना केली. त्या वेळी मला देवघरातील प.पू. डॉ. आठवले यांच्या छायाचित्राभोवती तेजस्वी प्रकाश दिसला. ‘देवघरातील तो तेजस्वी प्रकाश हळूहळू सर्वत्र पसरत आहे आणि त्या प्रकाशाने संपूर्ण ब्रह्मांड व्यापले आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझे रोम रोम त्या चैतन्याने भारित झाले होते आणि मी निःशब्दपणे उभा होतो. नंतर ‘हे गुरुदेवा, हे सारे या अज्ञानी जिवाला कळण्याच्या पलीकडील आहे. माझा योगक्षेम आपणच चालवत आहात. मला शरणागतीने तुमच्या चरणी मस्तक ठेवण्याच्या पलीकडे काही कळत नाही’, असे मी आत्मनिवेदन केले आणि संपूर्ण शरणागतभावाने प.पू. डॉ. आठवले यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला.

‘या पामराला क्षणोक्षणी डॉ. आठवले यांच्या चरणांचे स्मरण व्हावे’, हीच त्यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, फोंडा, गोवा. (२७.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक