पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधिकेने काव्यपुष्पासह लिहिलेले कृतज्ञतारूपी पत्र !

कु. वैभवी भोवर

१. कृतज्ञातारूपी पत्र

‘पू. (सौ.) अश्विनी आई,

१ अ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी रामनाथी आश्रमात ‘गुरुकुला’मध्ये येण्यास सांगणे : तू कुडाळ येथील सनातन सेवाकेंद्रात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या समवेत आली होतीस. तेव्हा आपली प्रथम भेट झाली. त्या वेळी मी केवळ १३ वर्षांची होते. त्या प्रथम भेटीत तू मला ‘‘रामनाथी आश्रमातील ‘गुरुकुला’मध्ये ये’’, असे सांगितले होतेस. नंतर मी रामनाथीला गुरुकुलामध्ये आले. तेव्हा सर्व साधकांमध्ये केवळ तूच माझ्या ओळखीची आणि जवळची होतीस. तशी आपली फार ओळख नव्हती किंवा जवळीकही नव्हती; पण तू गुरुकुलाची आध्यात्मिक आई असून तू मला गुरुकुलात बोलावले होतेस. यामुळे मला माझ्या या साधनाप्रवासात तू एकमेव जवळची वाटत होतीस.

१ आ. ‘पू. (सौ.) अश्विनीताई आध्यात्मिक आई आहे’, असे वाटणे : तेव्हा मी पुष्कळ भावनाशील होते. तू कुठे गेलीस, तर ‘ आता मी कुणाशी बोलणार ?’, असे वाटून मी रुसून बसायचे. मला रडू यायचे. माझ्याशी कुणी बोलत नव्हते आणि मला कुणाशी बोलता यायचे नाही. यामुळे मी मनातील सर्वकाही तुलाच सांगायचे. मी लहानसहान गोष्टीत तुझा पुष्कळ वेळ घ्यायचे. तुझ्याशी बोलतांनाही मला मनातील विचार लवकर मांडता यायचे नाहीत, तरीही तू हवा तेवढा वेळ देऊन मला समजावून सांगायचीस. त्यामुळे जणू ‘मी तुझे बाळ आणि तू माझी आध्यात्मिक आई’ होतीस.

१ इ. पू. (सौ.) अश्विनीताईंच्या सहवासात साधना आणि सेवा यांचे मार्गदर्शन मिळणे : पुढे तू देवद (पनवेल) येथील आश्रमात गेलीस आणि काही वर्षांनी देवाने मला शिकण्यासाठी पुन्हा देवदला तुझ्याजवळ पाठवले. तिथे तू साधना आणि सेवा यांविषयी मार्गदर्शन करून मला घडवू लागलीस. देवद आश्रमातील तुझ्या सहवासातून गुरुदेवांनी मला पुष्कळ गोष्टी शिकवल्या. आता जरी मी प्रसारात आणि तू आश्रमात आहेस, तरीही आपले हे आध्यात्मिक नाते अजून तसेच आहे. ‘मी तुझे बाळच आहे’, असेच मला नेहमी वाटते. गुरुदेवांनीच हे नाते मला दिले आहे. पू. ताई, हे नाते माझ्या जीवनात अतिशय अमूल्य असे आहे.

२. पू. (सौ.) अश्विनीताई, तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास मजपाशी शब्द न उरले !

‘आध्यात्मिक आई’ बनूनी तू माझ्या जीवनात आलीस ।

साधनेच्या पहिल्या टप्प्यापासून

माझ्या हाताला धरून मला घडवू लागलीस ।। १ ।।

स्वभाव माझा वेगळा जरी मला कधी तू दूर न केलेस ।

प्रेम देऊनी मजला सर्वकाही तूच शिकवलेस ।। २ ।।

तेव्हा तू होतीस गुरुकुलाची ‘आध्यात्मिक आई’ ।

आम्हा सर्व मुलांची प्रेमळ अश्विनीताई ।। ३ ।।

जरी आता सेवा पालटल्या, क्षेत्र पालटले ।

तुझा संपर्क होतो, तेव्हा मात्र

आईचा प्रेमळ सहवासच मी अनुभवते ।। ४ ।।

साधकांच्या लहानसहान गोष्टींचे कौतुक

करून तू हेरलेस त्यांचे अनेक गुण ।

त्या गुणांसह साधकांची आठवण

काढून देतेस जणू प्रीतीने आलिंगन ।। ५ ।।

या तुझ्या वाढदिवशी पुन्हा सर्व भावक्षण आठवले ।

‘तुझ्या जवळ येऊन कृतज्ञता

व्यक्त करावी’, असे मन म्हणू लागले ।। ६ ।।

तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास मजपाशी शब्द न उरले ।

‘तुझ्यासारखे निरागस आणि प्रेमळ

व्हावे’, हेच मज वाटू लागले ।। ७ ।।

कृतज्ञता गुरुदेव मज अशी आध्यात्मिक आई लाभली ।

‘तिचा लाभ करून घेता येऊ दे’,

हीच प्रार्थना तुमच्या पावन चरणी ।। ८ ।।

तुजसम गुरुदेवांचे लाडके होण्यासाठी, तसेच समष्टी भगवंताचे मन जिंकण्यासाठी मी तुझा आदर्श ठेवून प्रयत्न करते. तुझ्या या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या चरणी या बाळाचे आत्मनिवेदन अर्पण करते.’

– कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), पुणे (२६.६.२०२१)