…तर राहुल गांधी सर्वच क्रांतीकारकांना दोषी ठरवणार का ? – रणजित सावरकर

म. गांधी यांनीही स्वतःच्या सुटकेसाठी ब्रिटिशांकडे केलेल्या याचिकेत ‘मी तुमच्या सेवेस तत्पर आहे’, असे वाक्य लिहिल्याची श्री. रणजित सावरकर यांची माहिती !

राहुल गांधी व श्री. रणजित सावरकर

मुंबई – ‘क्रांतीकारकांनी कुठेही खितपत पडू नये. त्यांनी स्वतःची सुटका करून घ्यावी. सुटका करून बाहेर जा आणि सक्रीय व्हा’, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका होती. सचिनराज संन्याल या क्रांतीकारकांनी लिहिले आहे, ‘‘माझ्याप्रमाणे सावरकर यांनीही ‘माझी सुटका झाल्यावर मी कोणत्याही राजकारणात सहभाग घेणार नाही’, असे लिहून दिले. माझी सुटका झाली; परंतु त्यांची सुटका झाली नाही.’’ मग सर्वच क्रांतीकारकांना राहुल गांधी दोषी ठरवणार का ? अशी विचारणा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांना केली.

‘राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, असे तथ्यहीन वक्तव्य केले. त्यावर श्री. रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड केला.

श्री. रणजित सावरकर पुढे म्हणाले,

१. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या पत्राचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांनी इंग्रजांना ‘मी तुमच्या सेवेस तत्पर आहे’, असे लिहिले आहे. त्या वेळी असे लिहिण्याची पद्धतच होती.

२. स्वतः महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांकडे सुटकेसाठी केलेल्या याचिकेत हेच वाक्य लिहिले आहे. या इंग्रजी वाक्याचे मूर्ख राहुल गांधी यांनी गूगलवर ‘मै आपका नोकर बनना चाहता हूँ’, असे भाषांतर केले. राहुल गांधी यांना महात्मा गांधी यांनाही हाच न्याय लावायचा आहे का ? मी असे म्हणणार नाही; कारण मी मूर्ख नाही.

३. अंदमान येथील ‘सेल्युलर’ कारागृहातील बंदीवानांना ६ मासांनंतर कष्टाची कामे करण्यासाठी कारागृहातून बाहेर आणले जायचे; परंतु वीर सावरकर यांना ३ वर्षे कारागृहातच ठेवण्यात आले. बंदीवानांसाठी जे नियम आहेत, त्याप्रमाणे हक्क मिळावा, यासाठी त्यांनी अर्ज केला, भीक मागितली नाही.

४. वर्ष १९४४ मध्ये सावरकर यांनी इंग्रजांकडे केलेल्या दुसर्‍या अर्जामध्ये ‘देशावर सध्या महायुद्धाचे संकट आहे. माझ्या मुक्ततेवर तुम्हाला आक्षेप असेल, तर मला न सोडता अन्य बंदीवानांना सोडा’, असे म्हटले आहे. असे अर्ज करण्याची सवलत सर्व बंदीवानांना होती. यात कुठेही ‘माफीनामा’ असा उल्लेख नाही.

श्री. रणजित सावरकर