पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह फलक लावल्याचे प्रकरण

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या २ पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

पुणे – सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असलेला फलक लावून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे आणि बळीराम डोळे यांना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून कह्यात घेतले आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी भाजपचे माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

सारसबागेजवळ स्वातंत्र्यवीर स्मारकाजवळ काँग्रेसच्या काही कार्यंकर्त्यांनी ‘माफीवीर’ अशा आशयाचे फलक लावले. यावर काही संतप्त सावरकरप्रेमींनी हा फलक फाडून टाकला. त्यानंतर १८ नोव्हेंबरला भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी या स्मारकाला दुग्धाभिषेक घालून फलक लावणार्‍यांचा निषेध केला आणि पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. राहुल गांधी यांनी अकोला येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुणे येथील राजकीय वातावरण चिघळले आहे.