१. ‘मनमोकळेपणाने बोलण्याने होणारे लाभ’ यावर चिंतन करतांना लक्षात आलेली सूत्रे !
१ अ. मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रयत्न केल्यावर ‘साधिका भूमीच्या जरा वरून चालत आहे’, असे सत्संग घेणार्या कु. योगिता पालन यांना वाटणे : ‘एका सत्संगात योगिताताईंनी (सत्संगसेविका कु. योगिता पालन यांनी) सत्संगातील आम्हा सर्वांना ‘सर्वांनी मनमोकळेपणाने बोलायचे आहे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना करून प्रयत्न करायला आरंभ केला. दुसर्या दिवशी योगिताताई मला म्हणाल्या, ‘‘काल मला ‘तू हवेत म्हणजे भूमीच्या जरा वरून चालत आहेस’, असे वाटत होते.’’ त्यांनी असे सांगितल्यावर मला ‘या वाक्यावर चिंतन करावे’, असे वाटले; कारण नृत्य करतांना मलाही असे जाणवते. यावर चिंतन केल्यावर पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.
१ आ. ‘मनमोकळेपणे बोलण्यामुळे मनातील विचार नष्ट होऊन देह हलका झाल्यामुळे अधांतरी चालत आहे’, असे जाणवणे : आपल्या मनात पुष्कळ विचार असतात, तेव्हा आपला देह जड होतो. ‘मनमोकळेपणे बोलल्यावर आपल्या मनातील विचार नष्ट झाल्यामुळे आपला देह हलका होतो आणि ‘आपण हवेत किंवा भूमीच्या वरून चालत आहोत’, असे आपल्याला जाणवते.
१ इ. नृत्य करतांना देवाच्या अनुसंधानात रहात असल्यामुळे देह हलका होणे : ‘हे सूत्र नृत्याशीही संबंधित आहे’, असे मला वाटले. नृत्य करतांना मी देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे माझे मन पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित असते. त्यामुळे ‘माझा देह हलका होतो आणि मी हवेत किंवा भूमीच्या वरून चालत आहे’, असे मला जाणवते.
२. वरील विचारप्रक्रियेनंतर मनात आलेले प्रश्न आणि सूक्ष्मातून मिळालेली उत्तरे
प्रश्न १ : आपण भूमीच्या वरही नाही आणि खालीही नाही, म्हणजे भूतलावर असतो, तेव्हा आपली कुठली स्थिती असते ?
सूक्ष्मातून मिळालेले उत्तर : आपण भूमीच्या वरही नाही आणि खालीही नाही, म्हणजे, ‘भूतलावर असतो’, तेव्हा आपल्या मनात सतत विचार चालू असतात.
प्रश्न २ : त्यानंतर माझ्या मनात दुसरा प्रश्न आला, ‘आपण स्वतःच्या विचारांमध्ये न रहाता देवाच्या अनुसंधानात का रहायचे ?’
सूक्ष्मातून मिळालेले उत्तर : आपण स्वतःच्या विचारांत असतो, तेव्हा आपण देवाच्या अनुसंधानात नसल्याने आपल्याभोवती देवाच्या चैतन्याचे संरक्षककवच नसते. त्याचा लाभ घेऊन अनिष्ट शक्ती आपल्यावर आक्रमण करून त्रास देऊ शकतात. देवाच्या अनुसंधानात असतांना मनात सतत देवाचे विचार असल्याने आपल्याला सातत्याने देवाप्रती भाव अनुभवता येतो आणि आपल्याभोवती देवाच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होते. यातून आपल्याला गुरुदेवांची कृपा आणि देवाच्या अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व लक्षात येते.
‘हे सर्व गुरुदेवांनीच माझ्या लक्षात आणून दिले’, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता ! ‘हे गुरुदेवा, आपण करत असलेला कृपावर्षाव मला सातत्याने अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.’
– गुरुदेवांची, कु. शर्वरी कानस्कर, फोंडा, गोवा. (३.५.२०२२)
|