नागपूर येथे बाळाचे अपहरण करणार्‍या ४ जणांना अटक !

२ आरोपी पसार !

नागपूर – १० नोव्हेंबर या दिवशी येथील चिखली झोपडपट्टी भागात रहाणार्‍या राजकुमारी निषाद यांच्या ८ मासांच्या बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी रात्री १० वाजता ५ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील २ आरोपी पसार आहेत. फरजान उपाख्य असार कुरेशी, सीमा परवीन अब्दुल रूउफ असारी, बादल मडके आणि सचिन पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी योगेंद्र आणि त्याची पत्नी रिटा प्रजापती पसार झाले आहेत. रात्री तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ५ घंट्यांत अन्वेषण करून बाळाला आईकडे सोपवले.

काही दिवसांपूर्वी राजकुमारी निषाद यांच्या घराशेजारी आरोपी योगेंद्र आणि पत्नी रिटा प्रजापती रहायला आले होते. आरोपी त्यांच्या घरी जाऊन ८ मासांच्या बाळासमवेत खेळत असे. आरोपी योगेंद्र आणि रिटा हे दुपारी निषाद यांच्या घरी गेले आणि ‘बाळाला बाजूच्या दुकानातून खाऊ देऊन येतो’, असे सांगून घेऊन गेले. २ घंटे होऊनही ते परत न आल्याने बाळाच्या आईने शोधाशोध चालू केली. बाळ सापडत नसल्याने शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.