आतापर्यंत भारताच्या केवळ खोड्या काढणारा चीन अलीकडे भारतावर चांगलीच दादागिरी करू लागला आहे. डोकलामच्या घटनेपासून त्याची ही दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही मासांपूर्वी चीनने ‘युआन वांग-६’ ही नौका श्रीलंकेतील हंबनटोटा बेटावर उभी करून भारताच्या सुरक्षेला थेट आव्हान दिले होते. याविषयी भारताने श्रीलंकेकडे उघड अप्रसन्नता व्यक्त करून तिला या नौकेला येण्याची अनुमती नाकारण्यास सांगितले होते; परंतु ‘ड्रॅगन’च्या कर्जाच्या विळख्यात अडकलेली श्रीलंका झुकली आणि तिने अंततः या नौकेला अनुमती दिली. आताही असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला आहे. भारताकडून १० आणि ११ नोव्हेंबरला बंगालच्या खाडीमध्ये ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येणार होती. ही नियोजित चाचणी होती. तथापि धूर्त चीनने त्याची हेरगिरी करणारी हीच नौका या चाचणीच्या बरोबर काही दिवस आधी हिंदी महासागरात धाडली. तोपर्यंत ही नौका इंडोनेशियाजवळील समुद्रात होती. ‘युआन वांग-६’ या नौकेवर अँटिना, अत्याधुनिक पाळत ठेवणारी उपकरणे आणि ‘सेन्सर्स’ आहेत. त्यामुळे तिला अन्य देशांच्या समुद्राजवळ उभे राहून संबंधित देशांच्या जवळपासच्या संरक्षण स्थळांची सहज हेरगिरी करता येते. या नौकेची इलेक्ट्रॉनिक हेरगिरी करण्याची, उपग्रह प्रक्षेपणांवर लक्ष ठेवण्याची, तसेच लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या कक्षीय मार्गाचा मागोवा घेण्याची क्षमता आहे. या नौकेवर चीनचे ४०० सदस्य कार्यरत आहेत. याद्वारे चीनला भारताच्या क्षेपणास्त्राची सर्व माहिती बसल्या जागी मिळणार होती.
अंततः भारताला स्वतःची नियोजित क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित करावी लागणे, हे अतिशय गंभीर आहे. चीनने जर प्रत्येक वेळी त्याची नौका अशा प्रकारे उभी केली, तर आपण प्रत्येक वेळी आपली नियोजित चाचणी रहित करत बसणार का ? चीनच्या या वाढत्या दादागिरीला मोदी सरकारने आता ‘जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे. चीनच्या या चालीमुळे माघार घ्यावी लागली, याचा सूड भारताने उगवणे आवश्यक आहे, अन्यथा चीन भारताला अशाच प्रकारे आडकाठी आणत राहील आणि भारताला माघार घेत रहावी लागेल. चीनला धडा शिकवण्याचा नामी उपाय म्हणजे चीनशी सर्व व्यापारी संबंध तोडून टाकणे ! नाक दाबल्यावरच तोंड उघडत असेल, तर त्याला आपण तरी काय करणार ?
भारताच्या मुळावर उठलेल्या चीनला व्यापाराच्या माध्यमातून देशातून लाखो-कोटी रुपये घेऊन जाऊ देणे, हा आत्मघातच ! |