इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणारे आणि एकुलत्या एक मुलीला रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठवणारे बारामती येथील श्री. अरविंद कल्याणकर आणि सौ. सुजाता कल्याणकर !

श्री. अरविंद आणि सौ. सुजाता कल्याणकर यांना विवाहाच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

त्रिपुरारि पौर्णिमा (७.११.२०२२) या दिवशी श्री. अरविंद कल्याणकर आणि सौ. सुजाता कल्याणकर यांच्या विवाहाला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या त्यांच्या मुलीला (वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना) लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. अरविंद कल्याणकर

१. साधिकेच्या जन्मानंतर तिला मोठ्या प्रमाणात कावीळ होणे, साधिकेच्या आईने साधिकेसाठी पुष्कळ कष्ट घेणे

‘माझ्या जन्मापूर्वी माझ्या आईला एक मुलगी झाली होती; पण काही कारणांमुळे तिचा मृत्यू झाला. माझ्या जन्मानंतर मला मोठ्या प्रमाणात कावीळ झाली. त्यामुळे मला बालरोगतज्ञांच्या वेगळ्या चिकित्सालयात तत्परतेने भरती करावे लागले होते. देवाच्या कृपेने काही दिवसांनी माझी प्रकृती सुधारून मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. आधुनिक वैद्यांनी आईला सांगितले,

‘‘५ वर्षे मुलीला अतिशय काळजीपूर्वक सांभाळावे लागेल.’’ आईने माझ्यासाठी सर्वच स्तरांवर पुष्कळ कष्ट घेतले. नंतर मला एक भाऊ झाला; पण काही कारणांमुळे तोही जगू शकला नाही. श्री गुरुकृपेने आई-बाबांनी आणि घरातील व्यक्तींनी या प्रसंगांना धैर्याने तोंड दिले.

सौ. सुजाता कल्याणकर

२. साधिकेवर चांगले संस्कार करणे

आई-बाबांनी पहिल्यापासूनच घरातील सर्व कुलाचार आणि कार्यपद्धती समजून घेऊन त्यानुसार सर्व कुलाचार केले. आई-बाबांनी त्यांच्या आदर्श कृतीतून माझ्यावर चांगले संस्कार केले. आईने मला इतरांना निर्मळ मनाने साहाय्य करण्याविषयी शिकवले. त्यांनी मला अनेक गोष्टी बारकाव्यांनिशी आणि प्रेमाने शिकवल्या.

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर

३. साधिकेवर लहानपणापासून साधनेचे संस्कार करून तिच्यात साधनेचे बीज रुजवणे

मी लहान असतांनाच आई-बाबा सनातन संस्थेच्या सत्संगांच्या माध्यमातून साधनेत आले. पूर्वी आम्हाला काही जणांकडून साधनेसाठी पुष्कळ विरोध होता. श्री गुरुकृपेने आई-बाबा दोघेही साधनेत टिकून राहिले. त्यांनी मला बालसंस्कारवर्गांत पाठवले.

४. ते दोघेही काटकसरीने रहातात.

५. आई-बाबा आजी-आजोबांची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करतात.

६. इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणे

आई-बाबा त्यांच्या संपर्कातील सर्व साधक, शेजारी, बाबांच्या कार्यालयातील आणि समाजातील लोक या सर्वांना सर्वतोपरी साहाय्य करतात. काही वेळा आई-बाबा स्वतः अडचणीत असतांनाही इतरांना प्राधान्य देऊन त्यांना निरपेक्षपणे साहाय्य करतात. आई-बाबांच्या इतरांना सामावून घेण्याच्या वृत्तीमुळे नातेवाईक आणि समाजातील लोकही त्यांचे पुष्कळ कौतुक करतात.

७. परेच्छेने वागणे

ते नेहमीच परेच्छेने वागतात. त्यांनी माझ्यावरही कधीच त्यांचे मत लादले नाही. त्यांनी मला माझ्या आवडीनुसार सर्व घेऊ, करू आणि शिकू दिले. त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ काही केले आहे आणि आताही माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता करतही आहेत.

८. मुलीला साधना करण्यासाठी पाठिंबा देणे

आताही ते माझ्याकडून व्यष्टी साधना अन् समष्टी सेवा करून घेत आहेत. त्यांनी मला साधना करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. मी त्यांची एकुलती एक आणि लाडकी मुलगी आहे, तरीही त्यांनी लोकांच्या विरोधाला अन् अनेक प्रश्नांना सामोरे जात मला गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा यांच्या सेवांसाठी पाठवले. आता तर त्यांनी मला रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठवले आहे.

श्री गुरूंच्या कृपेमुळे मला असे विविध गुणांनी युक्त आई-बाबा लाभले. मी त्यांच्यामुळेच साधना करू शकत आहे. त्याबद्दल श्री गुरूंच्या चरणी आणि आई-बाबांप्रती कोटीशः कृतज्ञता ! ’

– वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२१)