मुंबई – आदरणीय पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी योग्य वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले पाहिजे. वाट चुकलेल्या स्त्रियांना ते योग्य मार्गावर आणत आहेत. कपाळावर कुंकू न लावणे म्हणजे हिंदु धर्माचे पालन न करणे होय, अशी भूमिका करणी सेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केली. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु महिलांनी कपाळाला कुंकू लावायला हवे’, अशी भावना सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे व्यक्त केली. एका हिंदु धर्मप्रेमीने हातात तलवार घेतलेले आणि कपाळाला चंद्रकोरीप्रमाणे कुंकू असलेले राजमाता जिजाऊ यांचे चित्रही प्रसारित करून ‘मराठा असशील, तर अपमान नाही, संस्कृती दाखवली’, असे ‘ट्वीट’ केले आहे.
अखिल भाविक वारकरी मंडळाचा पू. संभाजी भिडेगुरुजी यांना पूर्णपणे पाठिंबा आहे ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष
पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी महिला पत्रकाराकडे केलेले वक्तव्य अयोग्य नाही. भारताची संस्कृतीही हेच सांगते की, प्रत्येक महिलेने कपाळावर सौभाग्याचा दागिना ‘कुंकू’ परिधान करायला हवा. कपाळ रिकामे असणे ही संस्कृतीशून्य कृती आहे. काही जण म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये टिकली किंवा कुंकू लावावे किंवा लावू नये, हा आमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. त्याचप्रमाणे कुंकू न लावलेल्या स्त्रियांशी बोलायचे कि नाही, हे पू. संभाजी भिडेगुरुजींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळाचा पू. संभाजी भिडेगुरुजी यांना पूर्णपणे पाठिंबा आहे.