खडकवासला (जिल्हा पुणे) – चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २ नोव्हेंबर या दिवशी भेट देऊन पहाणी केली. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना त्यांनी दिले आहेत. प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामाच्या नियोजनाविषयी संबंधित अधिकार्यांसह त्यांनी सविस्तर चर्चा केली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते. श्री. कदम यांनी सांगितले की, सद्यस्थितीत उड्डाणपूल प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्ता आणि इतर कामे यांसाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला ५ मार्गिका आणि सातारा-मुंबईसाठी ३ मार्गिका अशा एकूण ८ मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच सातार्याकडून एन्.डी.ए. मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त २ मार्गिका उपलब्ध आहेत. बेंगळुरू मुंबई महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) आणि माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.