बलात्कार्‍यांना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवा !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री उषा ठाकूर यांची मागणी

भोपाळ (मध्यप्रदेश) – जर बलात्कारांच्या प्रकरणांतील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवले, तर इतर कुणीही असा गुन्हा करतांना एक सहस्र वेळा विचार करील, असे विधान भाजप सरकारमधील माहिती, पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. राज्यातील खांडवा जिल्ह्यात एका ४ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर त्या बोलत होत्या.

उषा ठाकूर पुढे म्हणाल्या की, मध्यप्रदेश सरकार अशा अमानुष घटनांचा कठोरपणे सामना करत आहे. बलात्कार्‍यांना फाशीची तरतूद असणारे हे पहिले राज्य आहे. आतापर्यंत अशा ७२ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे; पण तरीही अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असतील, तर मग हा आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्याला विविध माध्यमांतून समाजाचे प्रबोधन करायचे आहे; पण कुणी असे घृणास्पद कृत्य कसे करू शकतो ? मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे अशा गुन्हेगारांना भरचौकात फाशी द्यावी, अशी विनंती करणार आहे. दोषीला कारागृहामध्ये फाशीची शिक्षा दिली जाते; पण ती कुठे दिली जाते ?, हे कुणालाच ठाऊक नसते.