पिंपरी-चिंचवड पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परिपत्रक
पिंपरी (जिल्हा पुणे) – नागरिक पोलीस ठाण्यात लेखी, तोंडी तक्रार घेऊन येतात, तेव्हा त्यांना ताटकळत उभे रहावे लागते. त्यातून नागरिकांच्या मनामध्ये पोलीसदलाविषयी अपसमज निर्माण होतात. पोलीस सन्मानाची वागणूक देत नाहीत, तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात, असा नागरिकांचा समज होतो. याची गंभीर नोंद घेत महासंचालक कार्यालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ नोंद घेऊन त्यांचे समाधान करावे, याविषयी सूचना देण्यात आली आहे. नागरिक पोलीस ठाण्यात लेखी किंवा तोंडी तक्रार घेऊन येतात, तेव्हा संबंधित प्रभारी अधिकारी पोलीस ठाण्यात उपस्थित नसल्यास त्यांच्यापेक्षा कनिष्ठ पोलीस अधिकारी किंवा ठाणे अंमलदार यांनी तक्रार स्वीकारावी. नागरिकांना तक्रार स्वीकारल्याची पोच द्यावी. शक्य असल्यास वेळीच तक्रारींचे निरसन करावे, असेही आदेश परिपत्रकामध्ये देण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, स्थानिक पोलिसांनी नोंद न घेतल्यास थेट वरिष्ठांना ‘व्हॉट्सॲप’ करावे. त्यांच्या भ्रमणभाष क्रमांकांचे फलकही पोलीस ठाण्यात लावलेले आहेत. नागरिकांच्या तक्रारी न घेतल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाअसे परिपत्रक का काढावे लागते ? पोलिसांना स्वत:हून त्यांचे काम का करावेसे वाटत नाही ? |