खलिस्तान्यांना आर्थिक साहाय्य करा, शस्त्रास्त्रे पुरवा आणि त्यांना भारतामध्ये अशांतता पसरवण्याची चिथावणी द्या !

भारताच्या विरोधात खलिस्तान्यांचे संघटन करण्यासाठी जगभरातील पाकिस्तानी दूतावासांना ‘आय.एस्.आय.’चा फतवा

इस्लामाबाद – पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. भारतामध्ये अस्थिरता अन् फुटीरतावाद पसरवण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करत असतात. अशातच पंजाब राज्याला अस्थिर करण्याची मोहीम आखण्यासाठी आय.एस्.आय. आणि खलिस्तानी आतंकवादी यांच्यात लाहोरमध्ये अनेक बैठका झाल्या. यामध्ये जगभरातील पाकिस्तानी दूतावासांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या देशातील जिहादी आतंकवादी आणि खलिस्तानवादी यांना ‘आर्थिक साहाय्य करा’, ‘शस्त्रास्त्रे पुरवा’ आणि ‘त्यांना भारतामध्ये अशांतता पसरवण्याची चिथावणी द्या’, अशा प्रकारे सूचित करण्यात आले आहे. यासाठी आय.एस्.आय. ने ‘खालिस्तानी घोषणापत्र’ नावाने षड्यंत्रही सिद्ध केले आहे.

‘सिख फॉर जस्टिस’कडून बनावट ट्विटर खात्यांची निर्मिती !

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने ‘खालिस्तान जनमतसंग्रह’चे (‘रेफरेंडम’चे) सूत्र पुढे नेण्यासाठी १ सहस्र ४५० बनावट ट्विटर खाती सिद्ध केली आहेत. गेल्या एका मासात खलिस्तान जनमतसंग्रहाच्या समर्थनार्थ तब्बल २९ सहस्र ३२ ट्वीट्स करण्यात आले. हे ट्वीट्स ७ सहस्र ८२६ लोकांनी रिट्वीट (पुन्हा ट्वीट) केले. या खात्यांवरून हिजाबबंदीला विरोध, तसेच पाकिस्तानी सैन्य, काश्मीर आदी विषयांशी संबंधित ‘हॅशटॅग्ज’चा वापर करून ट्वीट्स करण्यात आले. बहुतेक खाती ही पाकिस्तानमधून चालवण्यात येत आहेत. या ट्वीट्सना पाकिस्तान, कॅनडा, जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटन येथे असलेल्या खालिस्तानवाद्यांकडून समर्थन मिळत आहे.

संपादकीय भूमिका

भारतविरोधी शक्तींना उकसवण्यामागे जिहादी पाकचाच हात असल्याने आता त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी भारतानी रणनीती आखणे आवश्यक !