पुणे शहरात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने दात्यांना रक्तदान करण्याचे रक्तपेढ्यांचे आवाहन

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – सध्या शहरामध्ये डेंग्यूचा फैलाव होत आहे. त्यामुळे त्या रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक ‘प्लेटलेट’ आणि इतर रक्तघटकांना असलेली मागणी वाढली आहे; परंतु शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेला रक्ताचा साठा पुरेसा नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी नियमित रक्तदात्यांनी पुढे येऊन ‘रक्तदान’ करावे, असे आवाहन शहरातील विविध रक्तपेढ्यांनी केले आहे. शहरात दीर्घकाळापर्यंत लांबलेला पाऊस, ठिकठिकाणी साचून राहिलेले पाणी, त्यातून डासांचा फैलाव यांमुळे शहरात डेंग्यू रुग्ण आढळून येत आहेत. सध्या दिवाळीची सुटी, त्यानिमित्ताने पर्यटन आणि इतर कारणांनी नियमित रक्तदानही शहरात होत नाही.

‘जनकल्याण रक्तपेढी’चे डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, प्रतिदिन किमान ५० रक्तदात्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात १५ ते २० दात्यांकडून रक्तदान होत आहे. त्यातून असलेली गरज भागवण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र गरज आणि पुरवठा सुरळीत होण्यासाठी दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करणे आवश्यक आहे.