सोलापूर येथील भद्रावती पेठ ते बोरामणी नाका रस्त्याची दुरवस्था !

खड्डे पडलेला रस्ता

सोलापूर, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरातील अनेक प्रमुख रस्ते मागील काही मासांपासून नादुरुस्त झालेले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे. भद्रावती पेठ ते बोरामणी नाका हा प्रमुख रस्ता सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी वापरला जातो; मात्र अनेक ठिकाणी अर्धा ते एक मीटर एवढा रस्ताच वाहून गेल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून अवजड वाहतूक केली जाते. रस्त्यावर पथदिवे नसल्याने मागील काही मासांपासून अनेक नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत शहरातील प्रमुख भागांत रस्ते आणि पथदिवे यांची कामे झालेली दिसून येत असली, तरी दुसरीकडे अनेक वर्षांपासून हद्दवाद भागातील नागरिक पक्क्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिका प्रशासनाने यात विशेष लक्ष घालून नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कृती का करत नाही ? – संपादक)