नागपूर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या वेळेत न आल्यास प्रवाशांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी मुंबईतील बेस्ट बसप्रमाणेच या बसगाड्यांचेही ‘लाईव्ह लोकेशन’ आता समजणार आहे. बसगाडी बस स्थानकात येण्यासाठी किती वेळ लागणार ?, ती सध्या कुठे आहे ? याविषयीची माहिती आता प्रवाशांना समजणार आहे. महामंडळाने नागपूर येथील सर्व आगारांमध्ये ‘डिस्प्ले बोर्ड’वर बसगाड्यांचे ‘लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टिम ऑन’ केले आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी बसगाड्यांचे वेळापत्रक सहजपणे पाहू शकतो.
काही दिवसांनी ही सुविधा प्रवाशांना त्यांच्या भ्रमणभाषवर प्राप्त होईल. महामंडळाच्या सर्व बसगाड्यांना नागपूर विभागात ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ने जोडले गेले आहे. महामंडळाच्या ‘अॅप’मध्ये लवकरच ही सुविधा चालू करण्यात येईल. यामुळे प्रवाशांच्याही अनेक तक्रारींचे निवारण होऊन त्यांचा प्रवास सुकर होईल.