तळेगाव दाभाडे (पुणे) – येथील ऐतिहासिक गावतळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तळ्यातील पाणी प्रदूषित होत आहे. वाहिनीद्वारे सोडण्यात येणारे सांडपाणी त्वरित बंद करून गावतळ्याला प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी करणारे निवेदन मावळ तालुका ‘मच्छिमार सहकारी सोसायटी’ने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते का लक्षात येत नाही ? – संपादक)
निवेदनामध्ये नमूद केले आहे की, गावतळे हे कृषी पणन मंडळाच्या स्वाधीन आहे. तळ्यामध्ये येणार्या सांडपाण्यामुळे तळ्यात सोडलेली सफरनेस, रहू, कटला, मरळ, ग्रास कारपीट, सिलवर आदी जातींची मच्छबीजे जगत नाहीत. तसेच नवीन बीज सोडले, तरी त्याची वाढ होत नाही. मासेमारीविना आम्हाला उपजीविकेचे दुसरे साधन नाही.