‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून उघड झालेले भारतविरोधी धक्कादायक वास्तव !

‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’(गंगेतील साप : भारताला तोडणे २.०) या इंग्रजी भाषेतील पुस्तकातून भारताला विविध ठिकाणांहून कोणते धोके आहेत, याची माहिती मिळते. भारताला पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून धोका असल्याचे जगजाहीर आहे; परंतु ‘अमेरिकेतील काही संस्थांकडूनही धोका आहे’, ही गोष्ट सर्वच जण जाणतात, असे नाही. भारतात लोकशाही आहे, तशीच ती अमेरिकेतही आहे. ‘पाश्चात्त्य देश आणि अमेरिका भारताच्या प्रगतीसाठी साहाय्य करतील’, असे म्हटले जाते; परंतु राजीव मल्होत्रा यांच्या ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून काही वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. भारताची प्रगती थांबवण्यासाठी आणि त्याचे तुकडे करण्यासाठी अमेरिकेमध्येच कशा प्रकारे काम चालू आहे ? ते कोण करत आहे ? आणि त्यांना कसे थांबवायचे ? यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.

१. अमेरिकेतील ‘फोर्ड फाऊंडेशन’कडून भारतविरोधी संस्थांना कोट्यवधी रुपयांचे साहाय्य करण्यात येणे आणि कुणालाही भारताची प्रगती नको असणे

अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ही माध्यमे नेहमी भारताच्या विरोधात लिहितात. त्यांना चीनने खरेदी केले आहे आणि ते स्वत:ला भारताहून श्रेष्ठ समजतात. अमेरिकेतील काही सामाजिक संस्थांना (‘एन्.जी.ओ.’ना) भारताला वाकवायचे आहे. यात ‘फोर्ड फाऊंडेशन’ हे प्रमुख नाव आहे. अमेरिकेत ‘फोर्ड’ नावाचे एक अध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या नावावर ही संस्था आहे. ही संस्था भारतातील अनेक सामाजिक संस्थांना साहाय्य करते. यातील काही संस्था देशाचे तुकडे करण्यात व्यस्त असलेल्या जिहादी विचारांच्या आहेत, तर काही संस्थांना भारताचा विकास थांबवायचा आहे, म्हणजेच त्या डाव्या (साम्यवादी) विचारांच्या संस्था आहेत.

अमेरिकेत जॉर्ज सोरोस नावाची एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे. तीही अशा संस्थांना सहस्रो कोटी रुपयांचे साहाय्य करते. अमेरिकेतील काही विद्यापिठे स्वत:ला अतिशय श्रेष्ठ समजतात. ‘अमेरिका श्वेत (गोर्‍या वर्णियांचे) राष्ट्र आणि भारत हे ब्राऊन (गहू वर्णियांचे) राष्ट्र असल्याने अमेरिका भारताहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे ‘आम्ही म्हटल्याप्रमाणे भारताने ऐकले पाहिजे’, असे त्यांना वाटते; पण ते आपल्याला मान्य नाही. आज अमेरिकेत ‘डेमोक्रॅटिक’ आणि ‘रिपब्लिक’ हे दोन पक्ष आहेत. त्यांनाही ‘भारताची प्रगती व्हावी’, असे वाटत नाही. याचा त्यांना संपूर्णपणे दोष देता येत नाही; कारण येत्या निवडणुकीनंतरच्या काळात त्या दोघांपैकी एक पक्ष राज्य करणार आहे.

२. भारतीय मूळनिवासी असलेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी भारताच्या विरोधात भूमिका घेणे

अमेरिकेत रहाणारे काही अनिवासी भारतीय हे विविध उच्चस्थानी विराजमान आहेत; परंतु ते भारताचा द्वेष करतात. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस याही भारतीय मूळनिवासी आहेत. त्या उपराष्ट्राध्यक्षा झाल्यावर भारतातील अनेक लोकांना आनंद झाला. अमेरिका जगातील महासत्ता आहे. तेथे अनिवासी भारतीय उपराष्ट्राध्यक्षा झाल्यामुळे ‘भारताला सर्व प्रकारचे साहाय्य होईल, तसेच भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळेल’, असे वाटले होते; परंतु तसे काही झाले नाही. हॅरिस आल्यावर त्यांनी भारताच्या विरोधात उलटसुलट चर्चा करणे चालू केले. भारतातील माध्यमांमध्येही असे लोक आहेत की, ज्यांना भारताचे चांगले व्हावे, असे कधीच वाटत नाही.

३. विदेशात अनेक भारतीय उच्च पदांवर कार्यरत असूनही तेथे भारताला विरोध होणे आणि तेथे करण्यात आलेल्या आक्रमणांमध्ये अनेकदा भारतियांचा बळी जाणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

ब्रिटनमध्ये नुकतेच सत्ता परिवर्तन झाले आहे. तेथील गृहसचिव भारतीय मूळनिवासी महिला आहे; पण तिलाही भारताच्या विरोधातच गोष्टी करण्यात स्वारस्य आहे. त्यांना ‘आता भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध चांगले होतील ना ?’, असे विचारण्यात आले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हे शक्य नाही; कारण भारतातून इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या लोक येतात; पण नंतर ते परतच जात नाहीत.’’ त्यांना ‘भारतातून इंग्लंडमध्ये अवैध घुसखोरी होते’, असे म्हणायचे आहे. त्यांचे म्हणणे काही प्रमाणात मान्य करावे लागेल. काही लोक तेथे अवैध रहात असतीलही; परंतु ते प्रमाण पुष्कळ नगण्य आहे.

उलट अमेरिकेत रहात असलेले बहुतांश अनिवासी भारतीय अतिशय कष्टाळू आहेत. आज जगात अमेरिकेची अर्थव्यवस्था बलवान असून त्यांचे डॉलर हे चलनही अतिशय सबळ आहे. त्यामागे ‘अनिवासी भारतीय अतिशय चांगले काम करत आहेत’, हे कारण आहे. ते तेथील प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. ‘अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संस्थेत ३० टक्के शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत’, असे म्हटले जाते. ‘गूगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’ यांसारख्या जगातील पहिल्या १०० प्रमुख आस्थापनांपैकी अनेकांचे मुख्याधिकारी भारतीय आहेत. असे असतांनाही तेथे भारताला विरोध होतो. अलीकडेच एका क्षुल्लक कारणावरून शीख कुटुंबावर आक्रमण झाले. त्यात ४ लोक मारले गेले. त्यात ८ मासांच्या एका गोड मुलीचाही समावेश आहे. कॅनडामध्येही भारतियांवर आक्रमणे झाली आहेत. इंग्लंडमधील लिसेस्टर या शहरात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाले. अशी कृत्ये भारतविरोधी लोकच करतात. कॅनडामध्ये एके ठिकाणी खलिस्तानवर सार्वमत होत आहे. भारत सरकारने कॅनडाला ते थांबवण्यास सांगितले; पण त्याने ती सिद्धता दाखवली नाही.

४. अमेरिकेतील भारतविरोधी शक्तींकडून भारताच्या विरोधात गहन युद्ध चालू असणे

राजीव मल्होत्रा त्यांच्या पुस्तकात हेच सांगतात की, भारताच्या विरोधात एक गहन युद्ध चालू आहे. या युद्धाला त्यांनी ‘ब्रेकिंग इंडिया 2.०’ संबोधले आहे. यात एक चांगली ‘आर्केस्ट्रटेड ग्लोबल मशिनरी (आंतरराष्ट्रीय असा एक जटील उपक्रम)’ असून तिची नवीन विचारसरणी आहे. त्यांच्या मते ‘भारत कधीच एक देश नव्हता. वर्ष १९४७ नंतरच भारताची संकल्पना समोर आली. ब्रिटीश नसते, तर भारत नावाचा देशच नसता.’ प्रत्यक्षात हे पूर्ण खोटे आहे.

त्यांनी एक सिद्धांत निर्माण करून ‘क्रिटिकल रेज थिअरी’ बनवली आहे. त्यात ‘अमेरिकेतील शिक्षणसंस्था आणि लोक हे भारताहून श्रेष्ठ आहेत’, असे समजले जाते. त्यांचा असा अपसमज आहे की, भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत, येथे जातीयवाद अधिक आहे, महिलांवर अत्याचार होतात, सत्ताधारी पक्षातील लोक अत्याचार करत असतात. या सर्व समस्यांतून भारताला वाचवण्यासाठी त्याचे तुकडे केले पाहिजेत. त्यामुळे भारतातील लोकांवरील आक्रमणे थांबतील आणि तो एक चांगला देश म्हणून समोर येईल. यात त्यांनी काही सिद्धांत (थिअरी) सिद्ध केले आहेत. त्यांना ‘वोग थिअरी’ म्हटले जाते. तेथील काही विद्यापिठांमध्ये भारताला वाचवण्यासाठी त्याचे विभाजन कसे करायचे, अशा प्रकारचे संशोधन केले जाते. तसेच त्यांना वाटते की, हॉवर्ड विद्यापीठ हे विश्वगुरु आहे आणि तेच भारताला वाचवू शकते. त्याला ‘वोकिझम’ असेही म्हटले जाते. चीन त्याचाच लाभ उठवत आहे.

५. भारताची प्रगती थांबवण्यासाठी सामाजिक संस्थांना विदेशातून सहस्रो कोटी रुपये मिळणे

आपल्याला ठाऊक असेल की, अमेरिकेतील सर्व संस्था ५० ते ६० सहस्र कोटी रुपये भारतात पाठवत होत्या आणि काही सामाजिक संस्थांना (‘एन्.जी.ओं.’ना) देत होत्या. त्यात मानवी हक्क, विकासामध्ये बाधा आणणे, महिला अत्याचाराच्या विरोधात आणि पर्यावरणरक्षण करणार्‍या काही संस्थांचा समावेश होता. या संस्था भारतात दुर्बलांवर अत्याचार होत असल्याचे चित्र निर्माण करतात. चीनमध्ये भारताहून १०० पट अधिक अत्याचार होत आहेत. त्याहून अधिक अत्याचार अमेरिकेत होतात. अमेरिकेत ‘गन पॉलिसी’ (बंदुकीविषयीचे धोरण) आहे. अमेरिकी स्वतःच्याच लोकांना ठार करतात. त्यांना काम करायचे नसून भारतातून स्थलांतरित होणार्‍या भारतियांकडून सर्व कामे करून घ्यायची आहेत.

६. जो बायडेन यांच्या उद्योगपती पुत्रांवर चीनचा प्रभाव असल्याने त्यांनी चीनला अनुकूल असे धोरण अवलंबणे

भारतातीलच काही विद्वान तेथे जाऊन भारतात चुकीचे घडत असल्याविषयी अपप्रचार करतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथे ‘भारत सरकार पालटले पाहिजे’, हा सिद्धांत पसरवला जातो. भारत सरकारला लोकांनी निवडून दिले आहे. त्यांना जर वाटले की, सरकार योग्य प्रकारे काम करत नाही, तर ते पुढील निवडणुकीत याहून चांगले सरकार निवडतील. केंद्रापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत लोकशाही मार्गाने निर्णय घेतले जातात.

भारतातील अत्यावश्यक असणार्‍या ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि ‘एन्.आर्.सी’ (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया) या कायद्यांना विरोध करण्यात आला. देहलीचे रस्ते बंद करण्यासाठी शेतकर्‍यांना भडकवण्यात आले. आज चीनने विविध मार्गांनी अमेरिकेत घुसखोरी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या मुलांच्या व्यवसायात चिनींचे मोठे समभाग आहेत. बायडेन पुत्रांवर चीनचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चीनला अनुकूल असे धोरण पालटले जाते. अशा अनेक सूत्रांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

७. पुस्तकाला ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ असे नाव देण्यामागील कारण

लोकांना वाटेल की, ‘स्नेक्स इन दी गंगा’ असे पुस्तकाचे नाव का देण्यात आले आहे; कारण गंगा ही भारतियांसाठी पवित्र नदी आहे. ‘गंगा स्नानामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि आपले चांगले होते’, अशी भारतियांची धारणा आहे. याच नदीमध्ये साप असेल, तर ते देशासाठी धोकादायक आहे. आज ज्या गंगेला आपण सुरक्षित समजतो, ती धोकादायक झाली आहे. आज गंगेचे पाणी वरून शांत दिसत असले, तरी आतमध्ये गडबड चालू आहे. ज्याप्रकारे २०० वर्षांपूर्वी इंग्लंडने वसाहत करून भारतावर पुष्कळ वर्षे राज्य केले, त्याच प्रकारचे वसाहतीकरण त्यांना करायचे आहे.

मल्होत्रा यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाला ‘१.०’ संबोधण्यात आले होते. त्यात त्यांनी देशासमोरील विविध धोके सांगितले होते. अधिक संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, भारतविरोधासाठी काही लोक गप्प राहून सर्व कृती करत आहेत. ‘दलित, मुसलमान, महिला यांच्यावरील अत्याचार आदी सामाजिक समस्यांसाठी सध्याचे केंद्र सरकारच उत्तरदायी असून ते तोडले पाहिजे’, याविषयी ते विविध क्षेत्रांतील लोकांना प्रभावित करतात. देशविरोधी कारवाया आणि अपप्रचार कसा चालू आहे, याविषयी हे पुस्तक योग्य प्रकारे माहिती देते. अशा देशविरोधी लोकांना भारतातीलच काही लोक कसे साहाय्य करतात आणि भारताला अमेरिकेसारख्या लोकशाहीप्रधान देशापासून किती हानी होऊ शकते, हे या पुस्तकातून समजते.

‘अमेरिका हा वाईट देश आहे’, असे म्हणायचे नाही. अमेरिकेतील ३-४ टक्के अनिवासी भारतीय पुष्कळ काम करतात; पण जॉर्ज सोरोस यांच्याकडून, तसेच फोर्ड फाऊंडेशन, हॉवर्ड विद्यापीठ यांसारख्या संस्थांकडून अशा प्रकारची उलटसुलट कामे केली जातात. त्यांना भारतातील तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ करून भारतातील विविध भागांमध्ये पसरवायचे आहे. यामुळे भारताची प्रगती अल्प होईल. तसे पाहिले, तर मार्क्सवाद आणि साम्यवाद हे रशिया अन् चीन यांच्याशी संबंधित आहेत; पण अमेरिकेतील काही लोकांना वाटते की, त्यांच्याविना देशाची प्रगती कुणीही करू शकत नाही. ते असे काही विषय उचलून धरतात, जे अनेकदा अनावश्यक असतात.

८. ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ या पुस्तकातून भारताने धोके समजून घेऊन ते दूर केले पाहिजेत !

या संशोधनासाठी आपण राजीव मल्होत्रा यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. हे ‘प्रोवोकेटिव्ह’ (चिथावणी देणारे) पुस्तक आहे. ते भारतियांचे डोळे उघडण्यासाठी साहाय्य करते. माझ्या मते हे पुस्तक भारतियांनी अवश्य वाचून त्यातील धोके समजून घेतले पाहिजेत. विशेष कारवाई करून भारत हे धोके कसे थांबवू शकतो, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत आपण हे धोके समजून घेत नाही, तोपर्यंत या धोक्यांच्या विरोधात योग्य प्रकारे कारवाई करता येणार नाही. हे पुस्तक भारताच्या शत्रूंना शोधण्यासाठी साहाय्य करते. त्यामुळे ‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ हे पुस्तक भारतियांनी वाचले पाहिजे.

जय हिंद !’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.

संपादकीय दृष्टिकोन 

देशविरोधी लोकांना एकत्र आणून त्यांना भारताच्या विरोधात कार्य करण्यास भाग पाडणार्‍या अमेरिकेचे खरे स्वरूप जाणा !