पेशवाईतील सुप्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे !

आज, २८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी रामशास्त्री प्रभुणे यांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

रामशास्त्री प्रभुणे

‘कार्तिक शुक्ल तृतीया या तिथीला पेशवाईतील सुप्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन झाले. ते सातारा जिल्ह्यातील माहुली येथील रहाणारे असून जातीने देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होत. वयाच्या २० वर्षांपर्यंत त्यांना विद्येचा गंधही नव्हता. ते प्रथम सातारा येथील सावकार अनगळ यांच्या घरी शिपाई म्हणून काम करत होते. एकदा सावकाराने अपमानकारक शब्द बोलून त्यांचा पाणउतारा केला; म्हणून ते काशीस गेले. तेथे त्यांनी अत्यंत श्रम घेऊन विद्या मिळवली. थोड्याच दिवसांत त्यांची ‘धर्मशास्त्री’ म्हणून ख्याती झाली. त्यांनी नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत धर्मखात्यात नोकरी धरली आणि नंतर ८ वर्षांतच रामशास्त्री मुख्य न्यायाधीश बनले. ते न्यायदानात अत्यंत निःस्पृह म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर अन्वेषण करून रघुनाथ पेशवे यांना देहांत शासनाचे प्रायश्चित्त सांगितले. स्पष्टवक्तेपणा, निःस्पृहता, धार्मिक व्यवहारात कालमान आणि परिस्थिती ओळखण्याचे मनोधैर्य अन् मराठी राज्याविषयी अनुपम निष्ठा यांच्या योगाने ते केवळ अद्वितीय न्यायाधीश झाले. एवढेच नव्हे, तर ती मराठेशाहीतील एक प्रचंड शक्तीच होती. त्यांनी न्याय आणि राजकारण यांचा योग्य संगम ठेवला. रामशास्त्री हे एक अलौकीक आणि कालदेश जाणणारे सुधारकही होते. ‘रामशास्त्रींना प्रतिमास अनुमाने १२० रुपये वेतन मिळत असे’, हे पेशवे दप्तरात नमूद आहे. त्यांच्या उत्तरकार्याचा व्यय पेशवे सरकारने केला.’

(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’