बीड, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरातून जाणार्या जुना धुळे-सोलापूर रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून प्रतिदिन दोन्ही बाजूने सहस्रो वाहने धावत असतात. शहरातून बार्शीकडे जाणारा रस्ता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावर एकत्र येतो. या रस्त्यावरून बार्शी रस्त्याकडे जाणारी वाहने आणि धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही पदरांवरून धावणारी वाहने या चौकात एकमेकांच्या समोर येतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शहरातून जालना रस्त्याकडे जाणारा रस्ता आणि धुळे-सोलापूर रस्त्यावर महालक्ष्मी चौक असून या रस्त्यावर शहरात येणारी, तसेच शहरातून जाणारी वाहने प्रतिदिन समोरासमोर येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महामार्गावरील वाहने अतीवेगात असल्याने या ठिकाणीही अपघाताचा मोठा धोका आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलांची आवश्यकता आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.