कोईंबतूर येथील मंदिराजवळील स्फोटामागे आतंकवाद्यांचा हात असल्यावरून चौकशी

स्फोटात ठार झालेला जमेझा मुबीन याचा इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून गेल्या वर्षी झाली होती चौकशी !

कोईंबतूर येथील मंदिराजवळील स्फोट व जमेझा मुबीन (चौकटीत)

कोईंबतूर (तमिळनाडू) – येथील कोट्टई ईश्‍वरम् मंदिराजवळ २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या स्फोटामागे आतंकवाद्यांचा हात आहे का ? या दिशेने तमिळनाडू पोलीस चौकशी केली जात आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी पोलिसांची ६ पथके सिद्ध केली आहेत. या स्फोटात जमेझा मुबीन (वय २५ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. ‘मुबीन याची वर्ष २०१९ मध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून त्याची चौकशी झाली होती’, असे पोलिसांनी सांगितले. ‘भविष्यात मोठ्या घातपातासाठी सिद्धता चालू आहे’, अशी शक्यता तमिळनाडूचे पोलीस महासंचालक सी. सिलेंद्र बाबू यांनी व्यक्त केली. संपूर्ण तमिळनाडूमध्ये विशेषत: दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

१. ‘मुबीन २ सिलिंडर घेऊन गाडी चालवत होता आणि त्यातील एकाचा स्फोट झाला’, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या घराची झडती घेतल्याने पोटॅशियम नायट्रेट, अ‍ॅल्युमिनियम पावडर, चारकोल आणि सल्फर यांसह स्फोटकासाठी वापरली जाणारी सामुग्री जप्त करण्यात आली.

२. स्फोट झालेल्या चारचाकीमध्ये वाहनांचे खिळे, संगमरवर आणि इतर गोष्टी सापडल्या असून त्यांची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

३. याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी आरोप केला आहे की, राज्यातील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकार या प्रकरणी लपवाछपवी करत आहे.