सातारा येथे नागरी वस्तीतील खासगी जागेत फटाक्यांची विक्री !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवाळीच्या निमित्ताने शहरातील नागरी वस्तीतील खासगी जागेत फटाक्यांची विक्री राजरोसपणे चालू आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

काही वर्षांपूर्वी नगरपालिकेसमोरील जागेत फटाक्यांचे कक्ष (स्टॉल) लावण्यात येत होते; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा परिषद मैदानावर हे कक्ष लावण्याचे प्रशासन आणि फटाके विक्रेते यांच्या मान्यतेने ठरले. त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार जिल्हा परिषद मैदानावर फटाक्यांचे कक्ष लावण्यात येतात; मात्र तरीही बाँबे रेस्टॉरंट चौक, विसावा नाका, शाहूनगर चौक, भूविकास बँक चौक, सदरबझार, देगाव फाटा अशा नागरी वस्तींमध्ये राजरोसपणे फटाक्यांची विक्री चालू आहे. या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. भरवस्तीत फटाक्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास जीवित आणि वित्त यांची हानी होऊ शकते. तरी प्रशासन याकडे लक्ष देणार का ? असा जागरूक नागरिकांचा प्रश्न आहे.

संपादकीय भूमिका

दुर्घटना घडल्यास उत्तरदायी कोण ?