सण धर्मशास्त्रानुसार साजरे करा !

पुणे येथे २० ऑक्टोबरपासून ‘दिवाळी पहाट’, गायन-वादनाचे कार्यक्रम, नृत्य, विनोदी आणि एकपात्री कार्यक्रम, जादूचे प्रयोग अशा विविध कार्यक्रमांना आरंभ झाला. ‘दिवाळी पहाट’चे संगीत कार्यक्रम केवळ मुंबई आणि पुणे अशा शहरांपुरत्याच मर्यादित न रहाता खेड्यातही आयोजित केला जात आहे. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम म्हणजे केवळ संगीत मैफल न रहाता पालटत्या काळात तो ‘इव्हेंट’ झाला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हे सर्व ऐकल्यानंतर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, असे वाटते; परंतु घरी पूजा करून धर्माचरण करण्याकडे लक्ष न देता अशा कार्यक्रमांना उपस्थित रहाणे, हे योग्य आहे का ? एवढेच नव्हे, तर दिवाळीच्या कालावधीत पर्यटनस्थळी जाण्याचा प्रकारही भारतात वाढत आहे.

यातून हिंदूच धर्माचरणाला डावलत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. याउलट पाश्‍चात्त्य आपल्या महान भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. अमेरिका त्यांच्या संसदेत दिवाळी साजरी करते. मलेशियामध्ये ‘हरि दिवाळी’ या नावाने दिवाळी साजरी होते. मलेशियामध्येही अभ्यंगस्नानाची परंपरा असून तेथील लोक फटाक्यांऐवजी मोठ्या प्रमाणावर पणत्या आणि दिवे लावून दिवाळी साजरी करतात. गयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, फिजी, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर अन् सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुटी असते. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. या सर्व देशातील स्थिती पाहिल्यास भारतापेक्षा अन्य देशांमध्येच दिवाळी खर्‍या अर्थाने साजरी होत आहे, असे म्हणावे लागेल.

जगाच्या इतिहासामध्ये ‘भारतीय संस्कृती’ला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. पाश्‍चात्त्यांना हिंदु संस्कृती का पटली ? याचा विचार करून आपल्या प्राचीन आणि महान संस्कृतीचे रहस्य भारतियांनी लक्षात घ्यायला हवे. ‘दिव्याखाली अंधार’ या म्हणीप्रमाणे आपणच आपले सण, प्रथा-परंपरा यांचे महत्त्व न्यून करत आहोत. येणार्‍या भावी पिढीला दिवाळी म्हणजे केवळ फटाके उडवणे, गीतगायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन अथवा मौजमजा करणे, हे नसून धर्माचरण म्हणून त्या दिवसांमध्ये सांगितलेल्या विविध पूजा आणि धार्मिक कृती यांचे महत्त्व सांगणे आवश्यक आहे, तरच आपली संस्कृती जपली जाईल ! हिंदु राष्ट्रातील प्रजा आध्यात्मिक स्तरावरील दिवाळी साजरी करणारी असेल !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे