फ्रान्समधील प्रचंड महागाईच्या विरोधात लाखो फ्रेंच रस्त्यावर !

  • रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

  • पगार वाढवण्याची आंदोलकांची मागणी !

  • ११ जणांना अटक, ८ पोलीस अधिकारी घायाळ

पॅरिस – रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या ८ मासांपासून चालू असलेल्या भीषण युद्धाचा फटका संपूर्ण युरोपला बसत आहे. रशियावर ‘नाटो’ देशांनी प्रतिबंध लादल्याने रशियाचे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांवर अवलंबून असणारे युरोपीय देश त्यांना मुकत आहेत. त्यामुळे संपूर्ण युरोपला महागाई आणि आर्थिक मंदी यांनी वेढले आहे. अशातच फ्रान्समध्ये महागाई दर ६.२ टक्क्यांवर पोचला आहे. महागाईच्या विरोधात लाखो फ्रेंच लोक रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलने करत आहेत. लोकांचे पगार वाढवण्याच्या मागणीसाठी सर्वसामान्य नागरिकच हिंसक निदर्शने करत आहेत.

१. अनेक फ्रेंच शहरांमध्ये चालू असलेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागले असून पॅरिसमधील आंदोलनाच्या वेळी किमान ८ पोलीस अधिकारी घायाळ झाले. या वेळी ११ आंदोलकांना अटक करण्यात आली.

२. महागाई एवढी झपाट्याने वाढली आहे की, सामान्यांना सध्याच्या पगारात जगणे कठीण झाले आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

३. यापूर्वी फ्रान्समधील तेल आस्थापनांच्या कर्मचार्‍यांनीही काम बंद करून पगारवाढीची मागणी केली होती. फ्रान्समधील अनुमाने ३० टक्के गॅस स्टेशनमध्ये पेट्रोलची न्यूनता आहे.

४. फ्रान्सखेरीज युरोपातील अन्य १९ देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. इस्टॉनिया देशात सर्वाधिक २३ टक्के महागाई दर आहे, तर खंडातील सरासरी महागाई दर ८.९ टक्के या विक्रमी पातळीवर पोचला आहे. ११ वर्षांतील ही सर्वाधिक टक्केवारी आहे.