कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’साठी आलेल्या अर्जाला तंटामुक्ती सभेत विरोध !

मद्यपींकडून होणार्‍या त्रासाच्या विरोधात ग्रामस्थांनी केली मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार !

संघटित होऊन ‘परमिट रूम’ला विरोध करणारे ग्रामस्थ सर्वांसाठी आदर्शवत् !

परमिट रूम’होणार तेथील जवळच असलेले ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर
बीअर शॉपी

कोतवडे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील गावणवाडी येथील अनिल नेवरेकर यांनी ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ असलेल्या स्वत:च्या निवासस्थानी ‘बीअर शॉपी’ थाटली आहे. यापुढेही जाऊन येथे ‘परमिट रूम’ही चालू करण्यासाठी त्यांनी कोतवडे ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आहे. याला गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी १९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या तंटामुक्तीच्या सभेत विरोध दर्शवला. या ‘परमिट रूम’च्या विरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पालकमंत्री उदय सामंत यांसह मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केली आहे.

गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी हा प्रश्‍न महात्मा गांधी तंटामुक्ती सभेकडे दिला होता. यावरून या दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थ आणि ‘परमिट रूम’साठी अनुमती मागणारे अनिल नेवरेकर यांना तंटामुक्ती सभेसाठी निमंत्रित करण्यात आले होते; मात्र अनिल नेवरेकर या सभेला अनुपस्थित राहिले. तंटामुक्ती सभेचे अध्यक्ष आशिष धुंदूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

या बैठकीला सरपंच संतोष बारगोडे, तंटामुक्ती समितीचे सदस्य श्रीकृष्ण मयेकर, दर्शन ठोंबरे, विठ्ठल लांजेकर, मजीद होडेकर, अशफाक पटेल, उमेश लाड, स्वप्नील मयेकर, संजय साळवी, मंगेश कांबळे, राजेंद्र कांबळे, श्रीमती माई महाडिक, सौ. संयुक्ता मांडवकर उपस्थित होते. गावणवाडी येथील वाडीप्रमुख श्री. रवींद्र गोताड यांसह ग्रामस्थ सर्वश्री पांडुरंग नाचणकर, गंगाराम नाचणकर, विजय ठोंबरे, विजय सापटे, संदीप मोहित, संदीप गोताड, नीलेश बाचिम यांनी सभेला उपस्थित राहून ‘परमिट रूम’ला अनुमती न देण्याची मागणी केली.

मद्यपींचा त्रास होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार !

परमिट रूम’ला अनुमती न मिळण्यासाठी दिलेले निवेदन

‘बीअर शॉपी’मध्ये येणारे मद्यपी रस्त्यावरच लघुशंका करतात. वाडीत जाण्याच्या पुलावर मद्यपी मद्य पिण्यासाठी बसतात. यांमुळे वाडीतील, तसेच अन्यत्रच्या महिलांना तेेथून जाता-येतांना मान खाली घालून जावे लागते. वाडीतील महिला रात्री-अपरात्री डॉक्टरांकडे जात असतात. या वेळी स्त्रियांना लज्जा उत्पन्न होईल, असे त्यांचे बोलणे असते. ‘बीअर शॉपी’च्या जवळच असलेल्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळही काहीजण मद्य पीत असतात. याचा आम्हास त्रास होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.


मंदिराची पावित्र्यता नष्ट होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी ‘परमिट रूम’ ला विरोध करावा ! – गावणवाडी आणि कोलगेवाडी ग्रामस्थ

‘परमिट रूम’च्या विरोधात संघटितपणे लढा देणार्‍या ग्रामस्थांचे अभिनंदन !

प्रशासनाला निवेदन देऊन ‘परमिट रूम’ला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थ

‘परमिट रूम’चा हा विषय, केवळ १-२ वाड्यांपुरता मर्यादित नाही. ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’ बांधणे, हे मंदिराची पावित्र्यता नष्ट करणारे आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’ होऊ नये, यासाठी सर्व ग्रामस्थांनी विरोध करावा, तसेच मंदिराच्या विश्‍वस्तांनीही याला विरोध करावा. ग्रामस्थांच्या या भावना ग्रामपंचायतीने  राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवाव्यात, तसेच ‘परमिट रूम’ला अनुमती देऊ नये, अशी मागणी तंटामुक्त सभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी केली. या वेळी ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार्‍या कार्यवाहीविषयी ग्रामस्थांनाही अवगत करण्यात यावे, अशी विनंती ग्रामस्थांनी केली.

या वेळी सरपंच संतोष बारगोडे आणि उपस्थित तंटामुक्ती समितीचे सदस्य यांनी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या विचारांशी सहमत असून या प्रकरणात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.