फटाके……काही अपरिचित गोष्टी !

१. वर्षभर होणार्‍या वायूप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ दिवाळीच्या फटाक्यांना लक्ष्य करणार्‍यांचा हिंदुद्वेष !

‘मागील वर्षी कोरोनाचे कारण देत काही राज्यांनी दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. ‘कारण देत’ असे शब्द योजण्यामागील कारण असे की, फटाक्यांमुळे कोविडच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो, हे केवळ एक तर्काधारित गृहितक आहे. आताच्या घडीला, तरी या गृहितकाचे समर्थन करणारी कोणतीही निश्चित आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यापूर्वी फटाके न फोडण्यासाठी प्रदूषणाचे कारण दिले जात होते. येथेही तीच परिस्थिती आहे. दिवाळीतील ५ दिवस फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात फार मोठी भर पडते, असे आकडेवारीनिशी आजवर दिसून आलेले नाही. उलटपक्षी वर्ष २०१९ मध्ये देहलीतील ‘इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट’ने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, फटाक्यांहून अधिक ध्वनीप्रदूषण हे वाहनांच्या ‘हॉर्न’मुळे होते. ‘आयआयटी कानपूर’ यांनी वर्ष २०१७ मध्ये केलेल्या संशोधनानुसार देहलीसारख्या शहरातील प्रदूषणाला सर्वाधिक कारणीभूत असलेल्या गोष्टी या वाहने, बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्र यांकडून होणारे वायूप्रदूषण आहे. ही आकडेवारी एखाद्या नामांकित संस्थेने समोर ठेवूनही आपल्याकडच्या ‘जमात-ए-पुरोगामी’कडून त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा केला जातो. इतकेच नव्हे, तर फटाके हे कसे वाईट आहेत, हे दाखवण्यासाठी ‘हिंदु धर्मामध्ये पूर्वीपासून कधीच फटाक्यांचा वापर होत नव्हता’, अशा पद्धतीच्या थापाही त्यांच्याकडून मारल्या जातात.

वैद्य परीक्षित शेवडे

२. हिंदु धर्मात फटाके फोडण्याची परंपरा सहस्रो वर्षांपासून चालू असल्याचा संदर्भ इतिहासात आढळून येणे

वैदिक आणि पौराणिक साहित्यामध्ये फटाक्यांचा सर्रास उल्लेख मिळत नसला, तरीही फटाके फोडतानांची काही शिल्पे ही दक्षिण भारतातील कित्येक मंदिरांमध्ये आढळून येतात. साहित्यातील फटाक्यांचे संदर्भ शोधायचे झाल्यास तेही न्यूनतम अडीच सहस्र वर्षे मागे जात असल्याचे आपल्याला दिसून येते.

अ. कौटिलीय अर्थशास्त्रामध्ये चाणक्याने ‘अग्नीचूर्ण’ या नावाने ‘सॉल्टपीटर’, म्हणजेच पोटॅशियम नायट्रेटचा उल्लेख केलेला आहे. ‘हे संयुग ज्वलनशील असून रणांगणावर शत्रूला चकवा देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते’, असेही मत त्यांनी मांडले आहे.

आ. ६ व्या शतकामध्ये काश्मीरमध्ये लिहिल्या गेलेल्या ‘नीलमत पुराण’ या ग्रंथामध्ये दिवाळीच्या दिवशी फटाके लावून आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असा उल्लेख आढळतो.

इ. १४ व्या शतकातील इटालियन प्रवासी लुडो विको डी वर्धमा याने विजयनगर साम्राज्यातील त्याच्या प्रवासाविषयी असे लिहून ठेवले आहे की, ‘ज्या वेळी हत्ती उन्मत्त होतात आणि आटोक्यात येत नाहीत, त्या वेळी शोभेच्या दारूने प्रकाश निर्माण करून त्यांना वठणीवर आणण्याचे काम या शास्त्रातील जाणकार लोक करतांना दिसून येतात.’

ई. याच शतकामध्ये गजपती प्रतापरुद्रदेव यांनी रचलेल्या ‘कौतुक चिंतामणी’ नामक संस्कृत ग्रंथांमध्ये दिवाळीत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांचे वर्णन आणि त्यांची चित्रेही चितारलेली आढळून येतात. गजपती हे ओडिशातील राजघराण्यातील नामांकित लेखक होते.

उ. १६ व्या शतकातील संत एकनाथ कृत ‘रुक्मिणी स्वयंवर’ या रचनेतही रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याचे उल्लेख आढळतात.

ऊ. पेशव्यांच्या बखरीत दिवाळीच्या रोषणाईचा आणखी एक रोचक संबंध आढळून येतो. राजस्थानातील कोटा या ठिकाणातील दिवाळीच्या रोषणाईविषयी महादजी शिंदे असे म्हणतात, ‘कोटामध्ये ४ दिवस दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. या कालावधीमध्ये तेथे लाखो दिवे उजळलेले असतात. इतकेच नव्हे, तर कोट्याचे राजे जनतेसाठी त्यांच्या महालांबाहेर ४ दिवस फटाक्यांच्या आतीषबाजीचे आयोजन करतात. यालाच ‘फटाक्यांची लंका’ असेही म्हटले जाते.

३. औरंगजेबाने फटाक्यांवर बंदी घालून दिवाळीत हिंदूंच्या आनंदावर विरजण टाकणे

फटाक्यांवर बंदी घालण्याचा रोचक संदर्भही साहित्यात आढळून येतो. हा संदर्भ आहे औरंगजेबाचा. २२ नोव्हेंबर १६६५ या दिवशी गुजरातच्या सुभेदाराला दिलेल्या आदेशात औरंगजेब असे म्हणतो, ‘अहमदाबादेतील कुठल्याही शहरात किंवा परगण्यांमध्ये हिंदूंची अंधश्रद्धाळू असलेली परंपरा दिवे लावणे आणि फटाक्यांची आतषबाजी या गोष्टींचा वापर होऊ नये. बाजारामधून दवंडी देण्यात यावी की, दिवाळीच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची रोषणाई केली जाणार नाही.’

४. हिंदु सामाजिक दायित्वामध्ये नेहमीच जागरूक असतांनाही त्यांनाच पर्यावरणाचा उपदेश देण्यात येणे

थोडक्यात काय, तर दिवाळीला अथवा इतर कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी फटाके फोडण्याची परंपरा ही गेल्या ५०-१०० वर्षांमधील नसून किमान अडीच सहस्र वर्षांचा इतिहास या प्रथेला आहे. त्यातही सण-उत्सव यांच्यात कालानुरूप कित्येक पालट होत असतात. त्या प्रत्येक पालटासाठी वेद किंवा पुराणे यांच्यात संदर्भ असायलाच हवे, असे काही नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर घरोघरी गणपति आणणे किंवा त्याहीपेक्षा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरूप आजच्या घडीला दिसून येते, तसे स्वरूप वैदिक आणि पौराणिक साहित्यामध्ये आढळून येत नाही; मात्र याचा अर्थ हिंदूंनी त्यांचे सण साजरे करू नयेत, असा होत नाही. किंबहुना हिंदू हे कायमच सर्वच गोष्टींमध्ये लवचिक राहिलेले आहेत. तरीही प्रत्येक वेळी पर्यावरण रक्षणाचे डोस हिंदूंनाच दिले जाणे, हे अत्यंत चुकीचे आहे.

५. फटाक्यांवर सरसकट बंदी न घालता स्वयंशिस्त आणि संयम यांचा अवलंब करणे आवश्यक !

फटाक्यांचा अवाच्या सवा वापर नकोच, यात तथ्य असले, तरी सरसकट बंदी हेही काही शहाणपण नव्हे. फटाक्यांचा व्यवसाय हा मोठी आर्थिक उलाढाल असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायाची बहुतांश हाताळणी, ही एकट्या तमिळनाडू राज्यातून केली जाते. शिवकाशी परिसरातील अनुमाने ८ लाख लोकांचे पोट या क्षेत्रावर अवलंबून आहे. दिवाळी हा त्यांच्यासाठी वर्षभराच्या कमाईचा कालावधी असतो. त्यामुळे तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ‘राजस्थान आणि ओडिशा यांसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फटाके बंदी करू नये’, अशी विनवणी केली आहे. आधीच कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि त्यामुळे सण, तसेच लग्नसमारंभ यांवर चाप लागला होता. त्यामुळे तोट्यात आलेल्या फटाक्यांच्या व्यवसायाला ऐन दिवाळीतील फटाकेबंदीच्या निर्णयामुळे फार मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. हस्तीदंती मनोर्‍यात वातानुकूलित खोलीत राहून आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरून प्रदूषण वाढवणार्‍या ‘जमात-ए- पुरोगामी’ला या गरिबांची व्यथा दिसत नसावी. पर्यावरण, आरोग्य कि उदरनिर्वाह ? तर या सार्‍याच गोष्टी समसमान महत्त्वाच्या आहेत. यासाठीच फटाक्यांवर सरसकट बंदी न घालता स्वयंशिस्त आणि संयमाचा अवलंब केला पाहिजे. दिवाळीत वेळेच्या आणि फटाक्यांच्या प्रकाराच्या मर्यादा आखून वापर करण्याचे कळकळीचे आवाहनही पुरेसे ठरू शकते. बाकी हिंदु समाज नक्कीच सूज्ञ आहे.’

– वैद्य परीक्षित शेवडे (पूर्वप्रसिद्धी : तरुण भारत) (साभार : ‘फेसबुक पेज’)

संपादकीय भूमिका

‘फटाक्यांमुळे आध्यात्मिकदृष्ट्या रज-तमात्मक प्रदूषण वाढते, तसेच कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. त्यामुळे फटाक्यांवर अधिक पैसे खर्च न करता साधना करणार्‍या गरिबांना किंवा साधना शिकवणार्‍या धार्मिक संस्थांना दान द्या !’