(म्हणे) ‘पाकिस्तान परमाणू शस्त्रास्त्रे सुरक्षित ठेवील, असा विश्‍वास !’

अमेरिकेची जिहादी पाकविषयी कोलांटउडी !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या विदेश विभागाने १७ ऑक्टोबर या दिवशी म्हटले की, परमाणू शस्त्रास्त्रांच्या सुरक्षेच्या संदर्भात आम्हाला पाकिस्तानच्या क्षमतेविषयी विश्‍वास आहे; परंतु त्याच्याकडे कोणत्याही सामंजस्याशिवाय ही शस्त्रास्त्रे आहेत. अमेरिकी विदेश विभागाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे अमेरिकेची भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले की, सुरक्षित आणि समृद्ध पाकिस्तान हा अमेरिकेच्या हितांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असे आम्ही मानतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान हा जगातील धोकादायक देशांपैकी एक असल्याचे वक्तव्य केले होते. ते असेही म्हणाले होते की, ‘पाककडे असलेल्या अण्वस्त्रांवर कुणाचेही नियंत्रण नाही.’ आता विदेश विभागाने केलेल्या या नव्या वक्तव्यातून ‘अमेरिका कोलांटउडी मारत आहे’, असे म्हटले जात आहे.

गेल्याच मासात म्हणजे ८ सप्टेंबरला अमेरिकेने एफ्-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकला ४५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ३ सहस्र ५८१ कोटी रुपये देण्याचे घोषित केले होते. गेल्या ४ वर्षांत इस्लामाबादला दिलेले हे सर्वांत मोठे सुरक्षा साहाय्य होते.

संपादकीय भूमिका

पाक हा जिहादी आतंकवादाचा निर्माता असतांना त्याच्यावर असा विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिहादी आतंकवादाविषयी स्पष्ट भूमिका मांडण्याचे जगाला आवाहन केलेले असतांना अमेरिकेच्या अशा दिशाहीन भूमिकेवर भारताने त्याला जाब विचारणे आवश्यक !