इराणच्या कुप्रसिद्ध कारागृहाला लागलेल्या आगीत ४ ठार, ६१ घायाळ !

गेल्या मासात मृत्यूमुखी पडलेली महसा अमिनी होती याच कारागृहात !

तेहरान (इराण) – येथील कुप्रसिद्ध इविन कारागृहाला लागलेल्या आगीमध्ये ४ कैदी ठार झाले, तर किमान ६१ जण घायाळ झाल्याचे वृत्त इराण येथील वृत्तसंस्थेने दिले आहे. मृतांची संख्या वाढू शकते, असे ‘बीबीसी’कडून सांगण्यात येत आहे. कारागृहातून धूर आणि आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात निघत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

इविन कारागृहामध्ये राजकीय कैद्यांनाही ठेवण्यात येते. याच कारागृहामध्ये गेल्या मासात कुर्दिश इराणी महिला महसा अमिनी हिला बुरखा न घातल्याने अटक केल्यानंतर ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशव्यापी आंदोलने चालू असून इराणच्या महिलाविरोधी धोरणांचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला जात आहे. अमिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते, तर तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांनी तिला मारहाण केल्याने ती दगावली, असा आरोप करण्यात आला होता.

या घटनेच्या विरोधात चालू असलेल्या आक्रमक निषेध आंदोलनांचा कारागृहाला लागलेल्या आगीच्या घटनेशी संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे ‘बीबीसी पर्शियन’कडून सांगण्यात येत आहे, तर स्थानिक प्रसारमाध्यमांनी असा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून ही आग घातपाताचा प्रकार असल्याचे मात्र स्वीकारले आहे.