सहनशील आणि सर्वांप्रती प्रीती असणार्‍या गोवा येथील सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी (वय ८५ वर्षे) !

‘पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आई) यांच्या आजारपणात मला त्यांची सेवा करण्याची अमूल्य संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सहवासात जाणवलेली सूत्रे खाली दिली आहेत.

पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी

१. सहनशीलता

पू. मळयेआजींच्या मांडीचा अस्थीभंग झाल्याने त्यांचे शस्त्रकर्म झाले होते. त्यामुळे मी पू. आजींना साहाय्य करण्यासाठी गेले होते. त्यांचे शस्त्रकर्म होऊन केवळ ५ दिवस झाले होते, तरी त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी स्मितहास्य असायचे. त्या सर्व त्रास सहन करूनही आनंदी असायच्या.

२. इतरांचा विचार करणे

पू. आजींसाठी साधक अल्पाहार आणून द्यायचे. कधी-कधी त्यांना भूक नसायची, तरी साधकांना वाईट वाटू नये; म्हणून त्या थोडासा अल्पाहार करायच्या. माझे अल्पाहार-जेवण इत्यादी वेळेत व्हावे, याची त्या काळजी घ्यायच्या.

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर

३. स्वीकारण्याची  वृत्ती असणे

पू. आजी नेहमी स्वीकारण्याच्या स्थितीमध्ये असतात. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी आणि समाधानी असतात. त्यांना अल्पाहार किंवा जेवणामध्ये जे काही दिले जायचे, त्या ते आनंदाने ग्रहण करायच्या. त्यांची कोणतीही आवड-नावड नसायची.

४. प्रीती

पू. आजींना कुणीही भेटायला आले, मग ते त्यांच्या ओळखीचे असो किंवा त्यांना प्रथमच भेटणारे साधक असो, त्यांना पुष्कळ आनंद व्हायचा. मी त्यांच्या सेवेनिमित्त त्यांना प्रथमच भेटले, तरी मला पाहिल्यावर त्यांना इतका आनंद झाला की, त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले. त्यांच्यातील ही प्रीती पाहून मला असे जाणवले की, ती आमची प्रथम भेट नसून आमची पूर्वीपासूनच ओळख आहे.

स्वतः आजारी असल्या, तरी त्या सर्वांची अत्यंत आपुलकीने चौकशी करायच्या. रुग्णालयातील परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांचीही त्या तेवढ्याच प्रेमाने विचारपूस करायच्या. त्यामुळे पू. आजींना भेटायला अधून-मधून अनेक जण यायचे. पू. आजींच्या प्रेमभावामुळे त्यांची सर्वांशी सहज जवळीक होते. पू. आजींचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे भगवंता, तुझ्याच कृपेमुळे मला संतसेवेची अमूल्य संधी लाभून त्यातून शिकायला मिळाले. त्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! पू. मळयेआजींचे गुण आम्हा सर्वांमध्ये येऊन आमची साधना करून घे, अशी तुझ्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२२)