मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलात नक्षलवाद्यांचे साहित्य मिळाले !

कुकर बाॅम्ब

गडचिरोली – कुरखेडा भागातील मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके आणि अन्य साहित्य असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर विशेष अभियान पथक गडचिरोली आणि बी.डी.डी.एस्. पथकाचे जवान यांनी कारवाई करून ते शोधून काढले आहे. ११ ऑक्टोबरला जंगलात पुरून ठेवलेले २ कुकर, २ क्लेमोर, १ पिस्तुल, वायरची २ बंडले आणि पाणी साठवण्याचा १ जर्मनचा गंज इत्यादी साहित्य कह्यात घेण्यात आले.

स्फोटकांनी भरलेले २ कुकर आणि २ क्लेमोर हे बी.डी.डी.एस्. पथकाच्या साहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. नक्षलवादी काही स्फोटक साहित्य सुरक्षादलांना धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने जंगलात पुरून ठेवतात. नक्षल सप्ताहात या साहित्याचा वापर करून ते स्फोट घडवतात.

नक्षलवाद्यांना हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करण्याचे आव्हान पुन्हा एकदा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.