ताडदेव (मुंबई) येथे बनावट पोलिसांनी वृद्धाला लुटले !

मुंबई – नवी मुंबई येथील रहिवासी विजय तुसलीदास गांधी (वय ७० वर्षे)  ताडदेव येथील ३५१ क्रमांकाच्या बस थांब्याजवळील ‘अंग्रेजी ढाब्या’समोर उभे होते. त्या वेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण विभागाचे) अधिकारी असल्याचे सांगितले. ‘सध्या ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत असून तुम्ही अशी बॅग घेऊन जात असल्याचे पाहून कुणीही तुम्हाला लुटू शकते’, असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांच्याकडील बॅग देण्यास भाग पाडले अन् त्यांतील १० लाखांची रोख रक्कम लुटून पोबारा केला.

गांधी यांनी या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

संपादकीय भूमिका

नागरिकांना लुबाडले जाईल, असे सांगून स्वतःच त्यांना लुबाडण्याच्या घटना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात गेली अनेक वर्षे होत असतांना अद्याप पोलीस लुटारूंचा बंदोबस्त का करू शकत नाहीत ?