मनाच्या आजारावर साधनेची मात्रा !

शारीरिक आरोग्याच्या जोडीला सध्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने होऊ लागलेली जागृती, ही एक चांगली गोष्ट आहे. यंदाही १० ऑक्टोबरला ‘मनःस्वास्थ्य : जागतिक प्राधान्य’ अशी संकल्पना घेऊन जागतिक स्तरावर ‘मानसिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात आला. यंदा मानसिक आरोग्याविषयी जागृती करण्याच्या ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या प्रयत्नांना २ दशके पूर्ण झाली. या २० वर्षांच्या कालावधीत मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी फलक लावणे, मेळावे भरवणे, प्रसिद्धीपत्रके काढणे आदी अनेकानेक उपक्रम राबवले गेले. असे असले, तरी यात खरोखरच किती यश आले ? याचा निर्मळपणे मागोवा घेणे आवश्यक आहे.

(चित्रावर क्लिक करा)

मानसिक अनारोग्याची भयावह आकडेवारी !

‘जागतिक आरोग्य संघटने’च्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, वर्षभरात जवळपास १ सहस्र २०० कोटी कामांचे दिवस हे नैराश्य आणि चिंता यांमुळे वाया जातात. शारीरिक आजारपणामुळे जेवढे दिवस वाया जातात, त्याहून अधिक वेळ निराशा, नकारात्मता, चिंता आदींमुळे वाया जातो. कामाच्या ठिकाणी असणारे वातावरण आणि कार्यपद्धती यांमुळे मनावर परिणाम होतो. आजमितीस जगभरात अनुमाने १५ टक्के कर्मचारी हे मानसिक अनारोग्याचा सामना करत आहेत. कामाचे स्वरूप ताणमुक्त व्हावे, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. कोरोना महामारीनंतर मानसिक विकारांमध्ये तब्बल २५ टक्के वाढ दिसून आली.

भारतासारख्या आध्यात्मिक भूमीतही मनोविकारांना बळी पडणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. भारतात प्रत्येक ७ माणसांमागे १ व्यक्ती नैराश्यादी मनोविकारांनी ग्रस्त आहे. ‘भारतीय संस्कृतीला सोडचिठ्ठी आणि पाश्चात्त्य जीवनशैलीची मगरमिठी’, यामुळे यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. रडून मन मोकळे करता येईल, असे खांदेच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे लोप पावले आहेत. माणसांचे मुखवटे हसरे असले, तरी खरे तोंडवळे मात्र चिंतातुर आहेत, याची नोंद घ्यायला हवी. आपल्याकडे ‘स्किझोफ्रेनिया’, ‘डिम्नेशिया’ यांसारखे आजार असतील, तरच वैद्यकीय उपचार घेतले जातात; पण अन्य अल्प तीव्रतेच्या मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केले जाते. किंबहुना ते आजार आहेत, हेच मान्य केले जात नाही. भारताने वर्ष १९८७ च्या कायद्यामध्ये सुधारणा करून वर्ष २०१७ मध्ये ‘मानसिक आरोग्य कायदा’ संमत केला; मात्र अनुभवी वैद्यांच्या म्हणण्यानुसार त्यात पाश्चिमात्य देशांच्या अनुकरणाचा भाग अधिक आहे. त्याऐवजी मनाच्या समस्यांवर उपाय म्हणून सांस्कृतिक आणि कौटुंबिक वीण भक्कम करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली, तर ते अधिक योग्य होईल.

आरोग्य मनाचे सदा राखावे !

मन हे दिसणारे नाही, तरीही ते इतके प्रभावशाली आहे की, मनात आणले, तर मनुष्य आकाशालाही गवसणी घालू शकतो; पण ते खचले, तर भूमीवर साधे उभे रहाण्यासही तो कच खातो. मानसिक आरोग्य हे त्या दृष्टीने आबालवृद्धांसाठी महत्त्वाचे आहे. मन खंबीर आणि सकारात्मक असेल, तर एक वेळ शारीरिक आजारांवरही मात करता येते; पण मनच दुर्बल असेल, तर शारीरिक सक्षमताही फारशी उपयोगी पडत नाही. आज मानसिक आजारांचा सामना करणार्‍या, तसेच त्यासाठी मानसोपचार तज्ञांकडे जाणार्‍या व्यक्तींकडे दुर्बलतेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. हा दृष्टीकोन पालटण्याची आवश्यकता आहे. आज प्रत्येक जण उणे-अधिक प्रमाणात मानसिक विकारांचा सामना करतच असतो. नैराश्य, चिंता, उद्विग्नता आदींचा अनुभव घेतला नाही, अशी एकही व्यक्ती नसेल; पण प्रत्येकाचा त्यातून बाहेर पडण्याचा कालावधीही उणे-अधिक असतो.

मना सज्जना भक्तीपंथेची जावे !

जागतिक आरोग्य संघटना मनाचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी पुरेशी झोप घेणे, सकस आहार घेणे, योगासने करणे, मोकळेपणाने बोलणे आदी उपाययोजना सुचवत असली, तरी तेवढेच उपाय पुरेसे नाहीत. मनःस्वास्थ्याचा खरा मार्ग आध्यात्मिक क्षेत्रातून जातो; म्हणूनच समर्थ रामदासस्वामींनी मनाच्या श्लोकांची रचना करतांना ‘मना सज्जना भक्तीपंथेची जावे’, असे म्हटले आहे. याचा अर्थ मनाला चांगले वळण लावायचे असेल, तर भक्तीमार्गाचे अनुसरण करण्याची अर्थात् साधना करण्याची आवश्यकता आहे. ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः।’ अर्थात् मनुष्याचे मनच बंध आणि मोक्ष यांचे कारण आहे. आपल्याकडे महामार्गांवर अपघात रोखण्यासाठी ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ असे लिहिलेले असते; पण ‘मनाचा ब्रेक लावायचा कसा ?’, याविषयी मात्र भाष्य कुठेही नसते. साधनेमुळे मनाला ‘ब्रेक’ लागू शकतो. केवळ साधनेमुळेच मन कामक्रोधादी षड्रिपूंच्या विळख्यातून बाहेर येऊ शकते. दरोडे टाकून लोकांची हत्या करणार्‍या वाल्या कोळ्याचे मन वळवण्याचे आणि त्याचे वाल्मीकिऋषींमध्ये रूपांतर करण्याचे सामर्थ्य केवळ नामजपामध्ये आहे. अनेक संतांनीही कलियुगात ‘नामस्मरण’ ही साधना सांगितली आहे. ‘मना उलटता होते नाम’, हे लक्षात घ्यायला हवे.

भारताला असणारी आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता, मानसिक आरोग्याच्या आजारांवर उपाय म्हणून आध्यात्मिकतेचा आसरा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे यांनी मानसिक आजारांवर उपाय म्हणून मनाचे श्लोक, दासबोध, ज्ञानेश्वरी, श्रीमद्भगवद्गीता आदी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास अन् प्रसार यांवर भर द्यायला हवा. मानसिक आजारांवर उपचार केल्या जाणार्‍या ‘मेंटल हॉस्पिटल्स’मध्ये रुग्णांकडून दिवसातून काही वेळ तरी उपासना करून घ्यावी. यातून त्यांना निश्चित मानसिक उभारी मिळेल. तात्पर्य हेच की, मनोविकार जडलेल्यांसाठी वैद्यकीय औषधोपचारांसह साधनेचीही मात्रा आवश्यक अन् क्रमप्राप्त आहे. असे केल्यास मने सुमने होतील आणि ती आनंदाने डोलून त्यांचा सुगंध सदासर्वकाळ दरवळत राहील !

मनोविकार जडलेल्यांना वैद्यकीय औषधोपचारांसह साधनेचीही मात्रा आवश्यक !