श्रीलंकेतील ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा पाकिस्‍तानी अमलीपदार्थ तस्‍कराचा प्रयत्न !

भारतात अमली पदार्थांच्‍या तस्‍करीच्‍या माध्‍यमातून उभारला जात आहे निधी !

प्रतीकात्मक छायाचित्र

इस्‍लामाबाद – पाकिस्‍तानातील एका अमलीपदार्थ तस्‍करावर भारतीय सुरक्षायंत्रणा लक्ष ठेवून आहेत. हा अमलीपदार्थ माफिया श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (एल्.टी.टी.ई.) ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा प्रयत्न करत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात हेरॉइनच्‍या तस्‍करीच्‍या माध्‍यमातून ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनरुज्‍जीवित करण्‍यासाठी निधी उभारला जात आहे. ‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’ने नुकतेच केरळच्‍या किनारपट्टीवर २०० किलो हेरॉईन जप्‍त केले आहे. अधिकार्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, हे हेरॉईन पाकिस्‍तानमधील हाजी सलीम याच्‍या मालकीच्‍या आस्‍थापनाशी संलग्‍न आहे. सलीम श्रीलंकेतील ड्रग माफिया सी गुणसेकरन् आणि पुकुट्टी कन्‍ना यांच्‍यासमवेत अवैध शस्‍त्रे आणि अमलीपदार्थ भारतात पाठवत होता, असे राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेला आढळून आले होते. ‘एल्.टी.टी.ई.’ला पुन्‍हा पुनरुज्‍जीवित करण्‍यासाठी ही शस्‍त्रास्‍त्रे सागरी मार्गाने पाठवली जात आहे. या प्रकरणी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने शस्‍त्रे जप्‍त केली असून दोन तरुणांना अटक करून अन्‍वेषण चालू केले आहे. तमिळनाडू पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी ‘एल्.टी.टी.ई.’पासून प्रेरित होते आणि त्‍यांना राज्‍यात सशस्‍त्र संघर्ष घडवून आणायचा होता. या आतंकवाद्यांकडे ‘एल्.टी.टी.ई.’चा नेता प्रभाकरन् याचे छायाचित्र, अवैध शस्‍त्रे आणि दारूगोळा सापडला होता, असे राष्‍ट्रीय यंत्रणेने सांगितले.