गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी सातार्डा येथे एकाला अटक

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांनी चेतावणी देऊनही परिणाम शून्य !

सावंतवाडी – गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार्‍या मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कोल्हापूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ११ ऑक्टोबर या दिवशी पहाटे तालुक्यातील सातार्डा येथे कारवाई केली. या कारवाईत पथकाने ४ लाख ६४ सहस्र ४०० रुपयांचे मद्य आणि ५ लाख २० सहस्र रुपयांची चारचाकी, असा एकूण ९ लाख ८४ सहस्र ४०० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी मुंबार्डेवाडी, सातार्डा येथील जनार्दन जयदेव मयेकर याला अटक करण्यात आली आहे.

फोंडाघाट येथे मद्याच्या अवैध साठ्याच्या विरोधात कारवाई

दुसर्‍या एका प्रकरणात कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे कणकवली पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीच्या मद्यासह ३२ सहस्र रुपयांचे साहित्य कह्यात घेतले. या प्रकरणी रामचंद्र उपाख्य बाबू तांबे (हवेलीनगर, फोंडाघाट) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का ?

गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायाने महाराष्ट्र राज्यात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर थेट मकोका अंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत) कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच दिली होती. असे असूनही लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक अद्याप चालू आहे. (याचा अर्थ संबंधितांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ? – संपादक)